गड-किल्ल्यांचे संरक्षण सर्वांची जबाबदारी
By admin | Published: February 12, 2017 12:34 AM2017-02-12T00:34:06+5:302017-02-12T00:34:06+5:30
संभाजीराजे : पन्हाळगडावरून गडकोट स्वच्छता मोहिमेस प्रारंभ
पन्हाळा : गड-किल्ल्यांचे संरक्षण व संर्वधन ही माझी, तुमची, सर्वांची जबाबदारी आहे. शिवछत्रपतींचा वारसा जपत असताना महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संरक्षण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन व गडसमितीचे ब्रँड अॅम्बॅसडर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. पन्हाळा येथे गड-किल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या युवकांना त्यांनी संबोधित केले. खासदार संभाजीराजे यांचा शनिवारी वाढदिवस असल्याने त्याना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. संभाजीराजे म्हणाले, येत्या १९ तारखेला शिवजयंती साजरी होत आहे. त्याचे औचित्य साधून ११ फेब्रुवारीपासून ही गडकोट स्वच्छता मोहीम सुरू करीत आहोत. महाराष्ट्रातील १०३ गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम शिवजयंतीपर्यंत चालू राहील. गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने ३५० कोटी रुपये मंजूर केले असून, सुरुवात रायगडवरून होणार आहे.
रायगड संरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात ७० कोटी रुपये पुरातत्त्व खात्याकडे वर्ग केले आहेत. या मोहिमेस पुरातत्त्व खात्याचे डायरेक्टर आॅफ जनरल पुरातत्त्व खात्याने मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके, निसर्गमित्र अनिल चौगुले, धैर्यशील माने, शाहीर दिलीप सावंत, कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रूपाली धडेल उपस्थित होते. पन्हाळगडावर वीर शिवा काशीद पुतळ्यापासून पुसाटीपर्यंत सर्व युवकांनी गड स्वच्छता करून अंदाजे दोन टन कचरा जमा केला. या मोहिमेत खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, युवराज छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्वांचा सहभाग होता.
या गड स्वच्छता मोहिमेत ८० संस्थांनी व विविध मान्यवरांसह २०००हून अधिक युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
पन्हाळगड येथे शनिवारी गड स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शन केले.