कॉँग्रेस नगरसेवकाना सोपविल्या जबाबदाऱ्या, शहरातील नेतृत्व शारंगधर देशमुख यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:48 PM2019-03-15T15:48:45+5:302019-03-15T15:51:22+5:30
पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख सांभाळणार आहेत.
कोल्हापूर : पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख सांभाळणार आहेत.
बुधवारी रात्री ‘अजिंक्यतारा’ कार्यालयात ही बैठक झाली. त्यावेळी कॉँग्रेस पक्षाचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीला आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांचे नाव बुधवार (दि. १३) पर्यंत जाहीर झाले नव्हते. त्यामुळे आमदार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून महाडिक यांच्यावर सातत्याने टीका करुन त्यांचा पराभव करण्याचे आवाहन जाहीर सभा, कार्यक्रमातून केले होते.
परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे आमदार पाटील यांना आता पक्षीय निर्बंधामुळे उघडपणे विरोधाची भूमिका घेता येणार नाही. जरी ते महाडिक यांच्या विरोधात सक्रिय राहणार नसले तरी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना तसेच कार्यकर्त्यांना जो संदेश द्यायचा तो त्यांनी देऊन टाकला.
कोणी कोणत्या भागात कशा प्रकारे शिवसेनेचा प्रचार करायचा, याचे नियोजन करून त्याच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. कॉँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांच्यावर शहरातील जबाबदारी दिली. पडद्याआडून मात्र आमदार पाटील यांचा विरोध हा कायमच राहणार आहे.
पी. एन. पाटील महापालिकेत
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील बुधवारी (दि. १३) दुपारी अचानक महानगरपालिकेत आल्याचे पाहून कॉँग्रेस पदाधिकारी तसेच नगरसेवकांना आश्चर्य वाटले. महापालिका चौकात गाडीतून उतरताच पी. एन. पाटील थेट आयुक्त कार्यालयात गेले. मंत्रालयातील एका अधिकाऱ्यासोबत पी. एन. आयुक्तांना भेटायला गेले होते, असा खुलासा नंतर झाला.
ही बातमी कळताच उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन पी. एन. यांना आपल्या कक्षात नेले; परंतु या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ अनौपचारिक गप्पा झाल्या.