डिप्लोमाच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर, शिवाजी विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:11 PM2020-10-23T19:11:46+5:302020-10-23T19:13:26+5:30
Shivaji University, student, educationsector, kolhapurnews पदविका (डिप्लोमा), पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी संलग्नित महाविद्यालये आणि अधिविभागांवर सोपविण्यात आली आहे. या परीक्षा दि. २७ ऑक्टोबर ते दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
कोल्हापूर : पदविका (डिप्लोमा), पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी संलग्नित महाविद्यालये आणि अधिविभागांवर सोपविण्यात आली आहे. या परीक्षा दि. २७ ऑक्टोबर ते दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने या परीक्षा शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालय आणि अधिविभागांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉम्प्युटर बेसड् टेक्सटाईल, फूड प्रोसेसिंग ॲण्ड प्रिझर्व्हेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, न्युट्रिशियन ॲण्ड डायटेटिक्स, ग्रीन केमिस्ट्री ॲण्ड क्रॉप प्रोटेशन, अशा विविध ५२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय, अधिविभागांकडून घेतल्या जाणार आहेत.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०३२ इतकी आहे. या परीक्षा ५० गुणांच्या आणि बहुपर्यायी प्रश्नावली (एमसीक्यू) पद्धतीने होतील. त्यासाठी एक तासाचा वेळ असणार आहे. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिकांची तपासणी करून गुण विद्यापीठाच्या संगणकप्रणालीमध्ये भरण्याची प्रक्रिया महाविद्यालय, अधिविभागांनी करायची आहे. या परीक्षा घेण्याचा खर्च विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आणि इतर सर्व अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा दि. २७ ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्याचे वेळापत्रक हे विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहीर केले आहे.