महिला सन्मानाची जबाबदारी सर्वांचीच
By admin | Published: August 5, 2016 01:21 AM2016-08-05T01:21:02+5:302016-08-05T01:59:37+5:30
मानवी साखळीसाठी कोल्हापूरकर सज्ज : समानतेची बीजे रुजण्यासाठी उपक्रम
कोल्हापूर : महिला किंवा मुलीवर अत्याचार झाला की तेवढ्या कालावधीपुरते महिलांना संरक्षणाचे धडे दिले जातात. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती. महिलांना स्वसंरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजेच; पण त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, ही जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे. म्हणूनच साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या दारात होणाऱ्या स्त्रीसन्मानाच्या या मानवी साखळीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत.
स्त्री-पुरुषाचे नाते कधी आई-वडील, पती-पत्नी, गुरू-शिष्य, भाऊ-बहीण, तर कधी मित्रत्वाचे. प्रत्येक नात्याला वेगळा रंग. या सगळ्या नात्यांत मुख्य धागा असतो स्त्रीसन्मानाचा. केवळ चूल आणि मुलाची सीमारेषा आखून दिलेल्या समाजात महिलांनी कर्तृत्वातून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे कुटुंबातील अवहेलनेपासून ते छेडछाड, अन्याय-अत्याचारापर्यंतच्या घटनांनी एक असुरक्षिततेची भावना मन पोखरून टाकते. हे चित्र बदलायचे असेल तर महिलांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाच्या मनात स्त्रीबद्दलचा आदर आणि समानतेची बीजे रुजविली पाहिजेत, या जाणिवेतून ‘लोकमत’ने उद्या, शनिवारी स्त्रीसन्मानाच्या मानवी साखळीचे आयोजन केले आहे. भवानी मंडपात सकाळी १० वाजता हा उपक्रम होणार आहे.
महिलांचा विषय आहे म्हणून केवळ महिलांनीच उपक्रम घ्यायचे ही विचारसरणी बदलण्यासाठी ‘लोकमत’चे व्यासपीठ सज्ज झाले आहे. म्हणूनच या मानवी साखळीत लहान मुलांपासून, प्रौढांपर्यंत सर्वजण सहभागी होऊ शकतात. प्रबोधनाची सुरुवात शालेय स्तरापासून सुरू करीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहभागी होत आहेत. तुम्हीही या आणि चळवळीचा एक भाग बना, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.
आजकाल मैत्री म्हणजे हातात बांधलेले फ्रेंडशिप बॅँड, भरपूर मित्र-मैत्रिणी, जल्लोष असे समीकरण झाले आहे; पण मैत्री म्हणजे सुरक्षिततेची अनुभूती देणारी भावना. या दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने आयोजित केलेली साखळी मानवतेच्या नात्याला जोडते. हा आवाज समस्त पुरुषांविरुद्धचा नाही, तर त्यांच्यातील काहीजणांमध्ये असलेल्या विकृतिविरोधातला आहे.
- वारणा वडगावकर, सामाजिक कार्यकर्त्या
पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यातून महिला-मुलींवर अत्याचार होतात. आता मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा अव्वल आहेत. त्या द्वेषाच्या भावनेतूनही अशा घटना घडतात. ही मानवी साखळी मुला-मुलीतला भेद विसरायला लावणार आहे. स्त्रीसन्मानाचे, मैत्रीचे नाते निर्माण करणार आहे.
- उमा इंगळे, नगरसेविका