शिक्षण रक्षणाची जबाबदारी ‘एसएफआय’वर
By Admin | Published: February 15, 2015 11:26 PM2015-02-15T23:26:47+5:302015-02-15T23:47:18+5:30
विनोद गोविंदवार : शिक्षण बचाव परिषद; भगत सिंग यांच्या नावाने अध्यासनाचा ठराव
कोल्हापूर : बाजारीकरण, चिकित्सक दृष्टिकोनाऐवजी वाढत चाललेला धर्मांधतेचा शिरकाव यापासून शिक्षण क्षेत्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियापुढे आहे़ विद्यार्थ्यांच्या एकजुटीने हे आव्हान पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफ आय)चे माजी राज्य सचिव विनोद गोविंदवार यांनी केले़ ते संघटनेच्या वतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये मंगळवारी आयोजित शिक्षण बचाव परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले़ अध्यक्षस्थानी डॉ़ सुभाष जाधव होते़ गोविंदवार म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शैक्षणिक परिसरातील लोकशाही मूल्यांचे अस्तित्त्वच संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ शिक्षणाचे जमातीकरण करणे सुरू आहे़ जगातील प्रत्येक शोध प्राचीन काळी आपल्याच देशात लागलेला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान परिषदांमध्ये जाहीरपणे सांगत आहेत; त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनाला खीळ बसत आहे़
गुजरात येथील शाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा संदर्भ देत गोविंदवार म्हणाले, प्रदेश, वंश, भाषा यांबाबत शिक्षण व्यवस्थेतूनच द्वेष निर्माण करण्याचे षड्यंत्र प्रतिगाम्यांनी सुरू केले आहे. या षड्यंत्राविरोधात समाजात जागृती करण्याचे काम आता ‘एसएफआय’ला करायचे आहे़
अध्यक्षीय भाषणात डॉ़ सुभाष जाधव म्हणाले, सर्वांना शिक्षण, सर्वांना काम याबाबत ‘एसएफ आय’ने नेहमीच अग्रणी भूमिका घेतली आहे़ संघटनेने देशभरात केलेल्या आंदोलनामुळेच ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा सरकारला करावा लागला़ सर्वसामान्यांंना शिक्षण मिळण्यासाठी संघटना लढा देईल़
सध्याच्या सरकारचा दृष्टिकोन धोकादायक आहे़ श्रमिकांची पिळवणूक करणारे अनेक कायदेही मोदी सरकार करीत आहे़ धर्माच्या नावाखाली भांडणे लावून घटनेतील धर्मनिरपेक्षतेलाच हरताळ फासला जात आहे़ अशा परिस्थितीमध्ये शहीद भगतसिंग यांनी अंगीकारलेला समाजवादी दृष्टिकोन पुढे नेणे आवश्यक आहे, असे मतही डॉ़ जाधव यांनी व्यक्त केले़
या परिषदेत संघटनेचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव, माजी राज्य सचिव उमेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले़ स्वागताध्यक्ष अनिल म्हमाने यांनी ठराव मांडले़ मीरा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर अक्षय जाधव यांनी आभार मानले़ ( प्रतिनिधी )