रोजंदारी पद्धत पुन्हा सुरू करा ;कंत्राटी वीज कामगारांची मागणी
By admin | Published: May 22, 2017 05:42 PM2017-05-22T17:42:19+5:302017-05-22T17:42:19+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २२ : रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. कंत्राटी पद्धत बंद करावी. रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांनी सोमवारपासून ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन सुरू केले. त्यात महावितरण आणि महापारेषण कंपनीतील सुमारे पाचशे कर्मचारी सहभागी झाले.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाबाबत संघाचे जिल्हा सचिव अमर लोहार यांनी सांगितले की, संघाच्या तिसऱ्या अधिवेशनात कंत्राटी कामगार कायम होईपर्यंत पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी याबाबतचा ठराव झाला होता. यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन प्रधान ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वीज उद्योगातील काही प्रमुख संघटना प्रतिनिधींची समिती स्थापन केली.
‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक मनोज रानडे यांनी याबाबतचा सकारात्मक अहवाल ऊर्जा खात्याकडे दिला आहे. रानडे समितीतील सर्व सदस्यांचे रोजंदारी कामगार पद्धतीवर एकमत झाले आहे. मात्र, आता शासन हे आर्थिक बोजाचे कारण देत याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संघाने राज्यभर ‘बेमुदत काम बंद ’आंदोलन सोमवारी सुरू केले. त्यात सहभागी होत कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणाबाजी केली.
आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, कोषाध्यक्ष मधुकर माळी, संघटकमंत्री अनिल लांडगे, शकील महात, अरुण गावडे, योगेश आयरे, के. पी. तांबेकर आदी सहभागी आहेत
. ...अन्यथा तीव्र आंदोलन करणार
या आंदोलनाची माहिती वीज उद्योगातील कंपनींना एक महिन्यांपूर्वी दिली आहे. त्यानंतर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ८ मे रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन संघाने केले असल्याचे जिल्हा सचिव लोहार यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या मागण्यांबाबत तीन दिवसांत सकारात्मक निर्णय वीज कंपन्या आणि राज्य सरकारने न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यात आमरण उपोषण, साखळी उपोषण आदींचा समावेश असेल. जिल्ह्यात रोज ४५० कंत्राटी कामगार हे विद्युत वाहिनीची दुरुस्ती, बिल वितरण-वसुली, लेखनिक आदी स्वरुपातील कामे करतात. ‘बेमुदत काम बंद आंदोलन’ सुरू केल्याने सोमवारी संबंधित कामे ठप्प झाली.