कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार निधीअभावी रखडला
By admin | Published: April 26, 2015 11:10 PM2015-04-26T23:10:17+5:302015-04-27T00:15:59+5:30
बहिरेश्वर गावचे ग्रामदैवत : १६ वर्षे काम प्रलंबित, ग्रामस्थांतून नाराजी
शिवराज लोंढे -सावरवाडी पांडवकालीन प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अन् राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिलेल्या बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या प्राचीन कोटेश्वर ग्रामदैवत मंदिराचा निधीअभावी गेली १६ वर्षे जीर्णोद्धार रखडलेला आहे.
बहिरेश्वर गावच्या मध्यवर्ती ठिकाणी हे प्राचीन कोटेश्वर मंदिर आहे. अकराव्या शतकाची साक्ष देणाऱ्या या मंदिराचे बांधकाम दगडी आहे. दगडी पाषाणावर कोरीव लेण्यांच्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. प्राचीन कालखंडातील एक पवित्र स्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. राज्य शासनाने कोटेश्वर मंदिरास तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मात्र शासकीय निधीअभावी रखडले गेले. ग्रामपंचायतीतर्फे अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष झाले आहे. नव्या बदलत्या काळात नव्या पिढीला प्राचीन ऐतिहासिक वास्तुचा ठेवा जपून ठेवण्यासाठी या मंदिराचे नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे.
मंदिराच्या सभोवती दगडी संरक्षण भिंती असून, त्यामध्ये दगडी कोरीव लेण्यांच्या मूर्ती दुरवस्थेत सापडल्या आहेत. संरक्षण भिंतीच्या झालेल्या पडझडीमुळे पाळीव जनावरांचा मंदिरात वावर होत आहे.
मंदिरात प्राचीन ऐतिहासिक मूर्ती असून, त्यांची जपणूक होत नाही. अनेक मूर्ती चोरीस गेल्या आहेत. बहिरेश्वर गावात गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक सांस्कृतीचा वारसा जपलेला आहे. श्रावण महिन्यात श्रीकृष्ण यात्रा, दसरा महोत्सव व भव्य हरिनाम सप्ताह सोहळा या मंदिर परिसरात साजरे होतात. पालखी सोहळ्यावेळी अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते.
ग्रामपंचायतीतर्फे कोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ४० लाख रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, निधीअभावी जीर्णोद्धार थंडावला आहे.
कोटेश्वर ग्राममंदिर अकराव्या शतकातील असून, लोकप्रतिनिधींकडून शासकीय निधीसाठी पाठपुरावा केला जात नाही. निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत.
- संभाजी बचाटे, सामाजिक कार्यकर्ते