वारणा नदीकाठचा शेतीचा वीज पुरवठा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:56+5:302021-08-28T04:28:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे सोयाबीन, भुईमूग, ऊस पिकांना पाणी देणे मुश्किल झाले ...

Restore power supply to farms along the river Warna | वारणा नदीकाठचा शेतीचा वीज पुरवठा पूर्ववत करा

वारणा नदीकाठचा शेतीचा वीज पुरवठा पूर्ववत करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे सोयाबीन, भुईमूग, ऊस पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. पिके वाळू लागली आहेत. कोणत्याही परिस्थितीत जलद गतीने कामे करून नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करा, कामात कसलीही हयगय करू नका, शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राध्यान्य द्या, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

वारणा नदी काठच्या पूरग्रस्त गावातील शेतीचा पाणीपुरवठा बंद आहे. ट्रान्सफॉर्मर, डी.पी.,पोल आदींचे नुकसान झाल्याने वीज पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात काल ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत शुक्रवारी आमदार आवळे यांनी अधिकाऱ्याची बैठक महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर बोलावली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

वडगाव कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता सचिन कुमार जगताप व हातकणंगलेचे उपकार्यकारी अभियंता सुरेश मैलापुरे यांनी येत्या आठ-दहा दिवसांत बऱ्यापैकी दुरुस्तीचे कामे होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. मुख्य लाईनची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. मोठ्या पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा सोमवारपर्यंत सुरू होईल. बारामतीहून दुरुस्तीसाठी १०० लोकांची टीम आल्याने कामे गतीने सुरू झाली आहेत, अशी माहिती दिली.

शेतकऱ्यांना कसलीही अडचण येऊ नये. सतत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अशा सूचना यावेळी आमदार आवळे यांनी दिल्या.

यावेळी बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, बुवाचे वाठार उपसरपंच शंकरराव शिंदे, रामचंद्र चौगुले, विजय पाटील, विजय परीट, कपिल पाटील, एम. के. चव्हाण आदींनी अडचणी मांडल्या.

सहायक अभियंता शरदकुमार संकपाळ, सागर हुजरे, इरफान सनदे, जयतीर्थ सांगलीकर, संदीप कांबळे उपस्थित होते.

फोटो ओळी- वारणा काठच्या पूरग्रस्त भागातील शेतीचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यासाठी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार राजू आवळे यांनी सूचना केल्या. यावेळी चेतन चव्हाण, शरद संकपाळ, इरफान सनदे, सुरेश मैलापुरे, सचिनकुमार जगताप , शंकरराव शिंदे उपस्थित होते. (छाया - आयुब मुल्ला)

Web Title: Restore power supply to farms along the river Warna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.