जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे, व्यापाऱ्यांचा पेच कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:07+5:302021-07-03T04:17:07+5:30
कोल्हापूर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट १३.८ टक्के असून, तो कमी न आल्याने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत स्तर ...
कोल्हापूर : मागील आठवड्यात जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट १३.८ टक्के असून, तो कमी न आल्याने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत स्तर ४ मधील जिल्ह्यांसाठी लागू असलेले निर्बंध शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत कायम ठेवले. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी काढले. यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याची केलेली मागणी आणि शासनाची मान्यता याचा पेच कायम राहिला. व्यापाऱ्यांनी तर सोमवारपासून सरसकट दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोना ससंर्गाची दुसरी लाट ओसरलेली असताना कोल्हापुरात मात्र अजूनही रोज १५०० ते १८०० रुग्ण सापडत आहेत. चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्ण अधिक येत असले तरी मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले दिसत नाही. त्यामुळे कोल्हापुरातील रुग्णसंख्या १३ हजारांच्यावर गेली आहे. मागील दोन आठवड्यांत या परिस्थितीत बदल झालेला नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट अजूनही १३.८ टक्के इतका आहे. त्यामुळे आगामी आठवड्यातदेखील शासनाने अनलॉक अंतर्गत दिलेल्या निकषानुसार कोल्हापूरचा समावेश स्तर ४ मध्ये असल्याने सध्या सुरू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुकाने सुरू करण्याच्या व्यावसायिकांच्या अपेक्षांचा मात्र भंग झाला आहे. गुरुवारपर्यंत शहर व जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट काय असेल यावर शासनाकडून व्यवसायाची परवानगी दिली जाणार होती. मात्र, आता निर्बंध कायम असल्याने हा पेच कायम असणार आहे.
--