कोल्हापूर विमानतळ परिसरात बांधकामास मर्यादा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:05 PM2024-07-12T14:05:27+5:302024-07-12T14:06:10+5:30

कोल्हापूर : विमानतळाच्या २० किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत दाखल्या’शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना ...

Restrictions on construction in Kolhapur airport area, District Collector instructions | कोल्हापूर विमानतळ परिसरात बांधकामास मर्यादा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर विमानतळ परिसरात बांधकामास मर्यादा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर : विमानतळाच्या २० किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत दाखल्या’शिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विमानतळ पर्यावरण व्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. विमानतळ परिसरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या बैठकीमध्ये कचरा व्यवस्थापन व आसपासच्या गावातील कचऱ्यामुळे पशू-पक्ष्यांची गर्दी वाढत असून, यामुळे विमान सेवेत येत असलेल्या अडचणीबद्दल विशेष चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या आसपासच्या परिसरामध्ये व रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा कचरा उघड्यावर न टाकण्याबद्दल येडगे यांनी निर्देश दिले. कचरा निर्मूलन प्रकल्प व सांडपाणी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय यादव यांना दिल्या. तसेच तामगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे वळतीकरण सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. 

विमानतळाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रलंबित जमीन अधिग्रहणासाठी अधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच विमान वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी कोल्हापूर व आसपासच्या वीस किलोमीटर परिक्षेत्रातील सर्व बांधकामास विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक आहे. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतल्याशिवाय बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वेब पोर्टलवर अर्ज करण्याच्या सूचनेचे फलक सर्व ग्रामपंचायती, टाऊन प्लॅनिंग कार्यालयास यावेळी सुपूर्द करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेतल्याशिवाय बांधकाम करू नका, असे आवाहनही यावेळी प्राधिकरणाकडून करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी हरीष धार्मिक, विमानतळ संचालक अनिल शिंदे, विमान वाहतूक प्रमुख राजेश अस्थाना, वरिष्ठ व्यवस्थापक दीपक जाधव, विशाल खरात, दर्पण सादये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहिता तोंदले, श्री. कांजर, बीएसएनएलचे श्री. देशमुख, इंडिगोचे चंदनसिंह, स्टार एअरचे नंदकुमार गुरव, करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय यादव उपस्थित होते.

Web Title: Restrictions on construction in Kolhapur airport area, District Collector instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.