ग्रामीण भागातही निर्बंध कडक, पोलीस गस्त वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:01+5:302021-06-02T04:19:01+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्बधांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्बधांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या प्रमुख आठ मार्गांवर पोलीस बंदोबस्तासह जिल्हा प्रशासनाचे ॲंटिजन तपासणीसाठी पथक कार्यान्वित असेल. जिल्हात प्रवेशणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ग्रामसमित्या, प्रशासनातील दोन अधिकारी, पोलीस यांची गस्त पथके तयार करून निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार, त्यासाठी काही गावावरही विशेष लक्ष ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत ते उपाययोजनांसाठी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही अटोक्यात आहे. येत्या पंधरा दिवसांत नागरिकांनीच निर्बंध पाळले तर हा कोरोनाचा आलेख पूर्णपणे कमी येईल. जिल्ह्याबाहेरील प्रादुर्भाव होणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून जिल्ह्यात प्रवेशणारे अंकली नाका, किणी नाका, कोगनोळी, शिरोळी (ता. चंदगड), गवसे (आजरा), गगणबावडा, आंबा, राधानगरी या आठ मार्गांवर कडक पोलीस बंदोबस्त तसेच प्रवेशणाऱ्यांची जाग्यावरच ॲंटिजन तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे पथक सक्रिय असेल.
करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यांवर लक्ष
करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, शिरोळ हे चार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. दहापेक्षा जास्त रुग्ण असलेल्या रेडझोन गावात पोलिसांची नाकाबंदी वाढविण्यात येत आहे. तेथील ग्रामसमित्या पुन्हा कार्यान्वित करून पोलीस बंदोबस्तात वाढ तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार या दोन अधिकाऱ्यांसोबत गस्त वाढवून कडक निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे.
नगरपालिका हद्दीतील आस्थापना सील करणार
अनेक ठिकाणी नगरपालिका हद्दीतील आस्थापना ह्या निर्बंधांतही सुरू आहेत. येथून पुढे त्यांच्यावर सीलबंदची कारवाई होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत कडक बंदोबस्तासाठी पोलीसही असतील. अत्यावश्यक सेवा विभागात असूनही निर्बधांचे पालन करीत नसल्यास त्यांच्याही आस्थापना सीलबंद करण्यात येणार आहेत.
पोलीस बंदोबस्ताची ड्युटी पुन्हा १२ तास
कोरोना कालावधीत पोलिसांनी खूप काम केले. त्यांना थोडा विसावा मिळावा यासाठी गेल्या आठवडाभरात आठ तासांची ड्युटी केली होती. पण बंदोबस्तात पोलीस यंत्रणा अपुरी पडू लागल्यामुळे पोलिसांची ड्युटी पुन्हा १२ तासांची केल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
भाजी मंडई मैदानात
शिथिलता दिलेल्या वेळेत पारंपरिकक भाजी मंडईमध्ये तसेच रस्त्यांवर भाजी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. ती कमी करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना खुल्या मैदानात, घरपोच करण्यासाठी काही वेळेपुरतीच परवानगी देण्यात येणार आहे.
६४ गावांत एकही कोरोना रुग्ण नाही
जिल्ह्यातील सुमारे १४०० गावांपैकी ६४ गावांमध्ये सध्याच्या स्थितीत एकही कोरोना रुग्ण सक्रिय नसल्याचे आढळले. गडहिंग्लज तालुक्यात गावा-गावात तहसीलदार, गटविकास अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन कोरोना रुग्णांचा आढावा घेतला.