दहावी फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:36 PM2018-08-29T16:36:25+5:302018-08-29T16:43:08+5:30
दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे.
कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल १७.१२ टक्के लागला. विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. कोल्हापूर, सांगली व साताऱ्या जिल्ह्यातील एकूण १३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८८ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्टमध्ये घेतलेल्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला.
कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव टी. एल. मोळे यांनी दिली. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, साताऱ्याच्या शिक्षण विस्तार अधिकारी एम. जी. चंदुरे, सांगलीचे विज्ञान पर्यवेक्षक पी. एस. मलगुंडे उपस्थित होते. राज्य शिक्षण मंडळाकडून दि ९ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान फेरपरीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील ८१५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१२६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३९१ जण उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागाचा निकाल १.८३ टक्क्यांनी घटला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १६. १२ टक्के आहे.
विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा २२. ५७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. सांगली १६.६३ टक्क्यांसह द्वितीय, तर ९.५८ टक्क्यांसह सातारा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. राज्याच्या एकूण निकालात कोल्हापूर विभाग आठव्या क्रमांकावर आहे. निकालाची आॅनलाईन प्रत विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून घेता येणार असल्याचे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले.
जिल्हानिहाय निकाल
जिल्हा टक्केवारी
- कोल्हापूर २२.५७
- सांगली १६.६३
- सातारा ९.५८
विभागातील आकडेवारी दृष्टिपेक्षात
- उत्तीर्ण मुलांची संख्या : ९७४
- उत्तीर्ण मुलींची संख्या : ४१७
- कोल्हापूरमधील उत्तीर्ण विद्यार्थी : ५७८
- सांगलीतील उत्तीर्ण विद्यार्थी : ५१५
- साताऱ्यातील उत्तीर्ण विद्यार्थी : २९८
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणे
या परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रावर सहा गैरमार्गाची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक सहा प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. साताऱ्यामध्ये एक प्रकरण घडले. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे, असे विभागीय सचिव मोळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविण्याची मुदत ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत, तर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ८ सप्टेंबरपर्यंत आहे.