ओखी वादळाचा परिणाम, कोल्हापुरात ढगाळ वातावरण..हलका पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:25 AM2017-12-05T11:25:26+5:302017-12-05T11:30:13+5:30
केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.
कोल्हापूर : केरळात आलेल्या ओखी वादळाचा परिणाम म्हणून कोल्हापुरातही ढगाळ वातावरण राहिले. सोमवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हे वातावरण आरोग्य बिघडवणारे असून जिल्ह्यांतील साखर उद्योगाच्या अडचणीत भर घालणारे आहे.
यंदाच्या हिवाळ्यात थंडी अशी सुरू होते तोपर्यंत वातावरणात बदल होतो आणि थंडी पळून जाते, असे दोनवेळा झाले आहे. गेल्या दोन दिवसांतही तसाच अनुभव पुन्हा आला. आता कुठे जरा थंडी जाणवू लागली होती तोपर्यंत रविवारपासूनच हवा दमट झाली. त्यामुळे थंडी गायब झाली. सोमवारी तर दिवसभर कुंद वातावरण राहिले. त्यामुळे निरूत्साह जाणवला.
सायंकाळी पाचच्या सुमारास हलका पाऊस झाला. या वातावरणामुळे ताप-थंडीसह अंगदुखीचा त्रास सुरू झाला. जिल्ह्यात सध्या साखर व गूळ हंगाम जोमात सुरू झाला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे त्यात अडचणी निर्माण झाल्या. पाऊस झाल्यास कारखान्यांच्या तोडणी-ओढणी कार्यक्रमावर परिणाम होतो. त्याशिवाय उसाच्या उताऱ्यांतही घट होते.
गुळाच्या प्रतीवरही या वातावरणाचा परिणाम होतो. रब्बीच्या पिकांना थंडी पोषक असते. दमट वातावरण झाल्यास आंब्यासह अनेक फळपिकांची फूल गळून पडून पडतात. त्याचा उत्पादनांवर परिणाम होतो. पिकांतील किडीचे प्रमाण वाढते म्हणजे हे वातावरण लोकांना आणि पिकांनाही घातक असते.