अध्यक्षपदाचा निकाल ३० सप्टेंबरला
By admin | Published: September 18, 2014 12:03 AM2014-09-18T00:03:55+5:302014-09-18T00:10:37+5:30
चित्रपट महामंडळ वाद: सुनावणी पूर्ण
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या दाव्यावर ३० तारखेला अंतिम निकाल देण्यात येणार आहे. कोल्हापूरातील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश केतकी चव्हाण यांच्यासमोर आज बुधवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली.
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर यांच्याविरोधात अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली होती. त्यांना अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांनीही साथ दिली. या तीनही सदस्यांवर कारवाई करण्यात अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत कार्यकारिणी सदस्यांनी विजय कोंडके यांच्याविरोधात अविश्वास ठराव करून त्यांना पदमुक्त केले होते. त्यावर हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत विजय कोंडके यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्यावर आज न्यायाधीश केतकी चव्हाण यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने अॅड. ए.पी. पोवार व के.व्ही. पाटील यांनी न्यायालयात या विषयावर निर्णय देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला. आज न्यायालयाने वादी आणि प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणावर ३० तारखेला अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर यांनी दिली.