राज्यातील ट्रेलरचे पासिंग पुन्हा सुरू
By admin | Published: February 5, 2015 11:25 PM2015-02-05T23:25:53+5:302015-02-06T00:38:18+5:30
उद्योगांना नवसंजीवनी : ब्रेकपॉर्इंट काढण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश
सतीश पाटील - शिरोली
गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले ट्रेलरचे पासिंग पुन्हा सुरू झाले आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशामुळे बंद पडलेल्या ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली आहे. हा अध्यादेश केंद्रीय परिवहन आयुक्त संजय बंडोपाध्याय यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना दिला आहे.
ट्रेलरला आॅईल ब्रेक आणि हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवणे याबाबतचा आदेश केंद्रीय वाहतूक आयुक्त कार्यालयाने सन २००९ मध्ये जारी केला आहे. त्यामुळे ट्रेलर उद्योग अडचणीत सापडले होते. गेल्या सहा वर्षांत ट्रेलर उद्योजक, केंद्रीय परिवहन खाते, सचिव व वाहतूक आयुक्त आणि ट्रॅक्टर कंपन्या यांच्यात बऱ्याचवेळा चर्चा, बैठका झाल्या.
यातून ट्रेलर उद्योगांनाही काहीवेळा पासिंग सुरू करून दिले होते; पण डिसेंबर २०१३ मध्ये माजी कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय वाहतूक आयुक्त संजय बंडोपाध्याय, ट्रॅक्टर उद्योजक आणि ट्रेलर उद्योजक यांची बैठक झाली होती. यावेळी ट्रॅक्टर कंपन्यांनी ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढून देण्याचे ठरले होते.
गेल्या पाच महिन्यांपासून ट्रेलर उद्योग बंद होते. ट्रेलरचे पासिंग सुरू करावे, यासाठी अॅग्रिकल्चरल असोसिएशन (आयमाच्या) माध्यमातून परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बंद पडलेले पासिंग पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे.
- कृष्णात पाटील, अध्यक्ष आयमा
पासिंग बंद असल्याने उद्योगच अडचणीत आले होते. ट्रेलरचे उत्पादन बंद होत आले होते. कामगारांनाही बेरोजगाराची वेळ आली होती. ट्रेलर पासिंग होत नसल्याने शेतकरीही संकटात होते. परंतु, पुन्हा ट्रेलर पासिंग सुरू झाल्याने ट्रेलर उद्योगांना नवसंजीवनी मिळाली.
- सुशांतकुमार मिरजे, ट्रेलर उद्योजक