इचलकरंजीत सूत व्यापाऱ्यावर विक्रीकर विभागाचा छापा
By Admin | Published: January 8, 2016 12:43 AM2016-01-08T00:43:52+5:302016-01-08T00:59:44+5:30
दिवसभर तपासणी : माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकार
इचलकरंजी : येथील कागवाडे मळा परिसरातील एका सूत व्यापाऱ्याच्या घरावर गुरुवारी विक्रीकर विभागाच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणी दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. मात्र, याबाबत माहिती देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.याबाबत मिळालेली माहिती अशी, कागवाडे मळा परिसरातील व्यापाऱ्याचा सूत खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. शहर व परिसरातील खासगी गोदामांमध्ये भाडेकरारावर सूत ठेवतात. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर परिक्षेत्रातील विक्रीकर विभागाच्या ३० जणांच्या पथकाने व्यापाऱ्याच्या निवासस्थानी छापा टाकला. कागदपत्रांची तपासणी, तसेच खरेदी-व्रिक्री व्यवहाराची पडताळणी करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
खरेदी-विक्री व्यवहारातून शासनाचा कर बुडविला आहे का, याची खातरजमा करण्याचे काम या पथकाकडून केले जात असल्याचे समजते. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईबाबत माहिती देण्यास नकार दिला. (वार्ताहर)