पोलिस दलातील ‘अल्टोसॅक्सोफोन’चा राजा निवृत्त

By admin | Published: April 30, 2017 07:02 PM2017-04-30T19:02:10+5:302017-04-30T19:02:10+5:30

३९ वर्षांच्या सेवेनंतर बँडमास्तर रफिक पठाण सेवानिवृत्त

Retired King of the Altoxophone in the police force | पोलिस दलातील ‘अल्टोसॅक्सोफोन’चा राजा निवृत्त

पोलिस दलातील ‘अल्टोसॅक्सोफोन’चा राजा निवृत्त

Next

आॅनलाईन/लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : कोल्हापूर पोलिस दलातील बँड अर्थात वाद्यवृंद मुख्य बँडमास्तर सहायक फौजदार व ‘अ‍ॅल्टोसॅक्सोफोन’ वाद्यावर उपस्थितांना डोलायला लावणारे रफिक पठाण हे ३९ वर्षांच्या सेवाकालानंतर रविवारी निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या सेवाकालात अनेक दिग्गजांना वाद्यवृंदाच्या माध्यमातून सलामी दिली आहे.

पोलिस वाद्यवृंद पथक म्हटले की, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्यदिन, दसरा महोत्सव आणि महत्त्वाच्या लोकांच्या नातेवाइकांच्या लग्नात खास बाब म्हणून या वाद्यवृंदाचे पथक हे हमखास आकर्षण असते. यात ‘राष्ट्रगीत’ असो वा ‘सारे जहॉँ से अच्छा’; हे पथक खास पोलिसी शिस्तीत पण समरसून सुरांशी संगत करते. तशी कोल्हापूर पोलिस दलातील वाद्यवृंदाची स्थापना संस्थानकाळातील ‘राजाराम रायफल्स’मधून झाली. यात अनेक बँडमास्तरांनी आपल्या नियंत्रणातून अनेक कार्यक्रम व महनीय व्यक्तींना सलामी दिली.

आतापर्यंत या पथकातून सहायक फौजदार मारुती गो. जाधव (१९७५ ते १९८२), राजाराम द. भोसले (१९८२ ते ८३), सहायक फौजदार विश्वनाथ द. लाड (१९८३ ते १९९९), भगवान कृ. कांबळे (२००० ते २००१), नूरमहम्मद अ. कुडची(२००२ ते २००५), अल्लाबक्ष का. महात (२००६ ते २०११), आनंदराव सुतार (२०१२ ते २०१६), रफिक पठाण (२०१६ ते २०१७) यांनी वाद्यवृंद पथकाची शान वाढविली. यात रफिक पठाण यांनी तर या पथकात ३९ वर्षांच्या सेवाकाळात अ‍ॅल्टोसॅक्सोफोन या वाद्यावर अनेक धून वाजविल्या. त्यांनी विशेष म्हणजे इंग्लिश मार्च, वेस्टर्न मार्च आणि काळानुसार बदलत मराठी गीतांच्या धूनना आपल्या वाद्यवृंद पथकात स्थान दिले.

पठाण यांनी उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी कोल्हापूरला भेट दिली त्यावेळीसुद्धा वाद्यवृंद पथकातून त्यांना सलामी दिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, शरद पवार, आदी महनीय व्यक्तींना वाद्यवृंदाच्या माध्यमातून सलामी दिली. पोलिस दलाच्या वाद्यवृंदाची त्यांनी सातत्याने शान वाढविली. रविवारी ते ३९ वर्षांच्या सेवेनंतर नियमितपणे निवृत्त झाले. त्यांच्या जागी नूतन वाद्यवृंद पथक प्रमुख म्हणून सहायक फौजदार श्रीकांत कोरवी हे काम पाहणार आहेत.

मी पोलिस दलात १९७७ साली दाखल झालो. त्यात वाजविण्यास अवघड समजले जाणारे ‘अ‍ॅल्टोसॅक्सोफोन’ हे वाद्य मी वाजवत होतो. सेवाकाळात अनेकदा तिरंग्याला सलामी देण्याचे भाग्य लाभले. यासह अनेक महनीय व्यक्तींनाही सलामी देण्याचे काम केले, याचा मला सार्थ अभिमान आहे.

रफिक पठाण,

निवृत्त सहायक फौजदार,

वाद्यवृंद पथक प्रमुख

Web Title: Retired King of the Altoxophone in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.