गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:40+5:302021-07-10T04:16:40+5:30
गडहिंग्लज : सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी व इतर थकीत देणी मिळवून देण्यासाठी कारखाना प्रशासन आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक तातडीने ...
गडहिंग्लज : सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी व इतर थकीत देणी मिळवून देण्यासाठी कारखाना प्रशासन आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अन्यथा १९ जुलैपासून प्रांतकचेरीसमोर पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. औद्योगिक न्यायालयाचा निकाल कामगारांच्या बाजूने लागूनदेखील ‘कारखाना व ब्रिस्क कंपनी’ दोघेही आपल्या सोयीनुसार अर्थ काढून कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
३१ मार्च २०२१ रोजी ब्रिस्क कंपनीने हा कारखाना सोडला आहे. त्यामुळे हा कारखाना अन्य कोणी चालवायला घेणार असतील तर सेवानिवृत्त कामगारांच्या देणीचा उल्लेख करारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्यानुसार देय असलेली ग्रॅच्युईटी व थकीत देणी सेवानिवृत्तांना मिळवून देण्यासाठी संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात चंद्रकांत बंदी, रणजित देसाई, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, सुरेश पाटील, महादेव मांगले यांचा समावेश होता.