‘महावितरण’ची सेवानिवृत्ती योजना
By Admin | Published: March 30, 2017 11:59 PM2017-03-30T23:59:04+5:302017-03-30T23:59:04+5:30
पाल्यास नोकरीची संधी : एप्रिलपासून होणार लागू
कोल्हापूर : ‘महावितरण’च्या वर्ग ‘तीन आणि चार’च्या लाईन फोरमन, मुख्य तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ, आदी पदांना शनिवार (दि. १ एप्रिल)पासून ‘मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.
जे तारमार्ग कर्मचारी आपली दैनंदिन कर्तव्य आजारपण, अपघात, आदी कारणांमुळे पार पाडू शकत नाहीत अशा ‘वर्ग-३’ व ‘वर्ग ४’ च्या संवर्गासाठी मुदतपूर्व सेवानिवृत्ती योजना लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘वर्ग-३’मध्ये मोडत असलेल्या कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ४५ वर्षे पूर्ण आणि ५३ वर्षांपर्यंत असणे आणि ‘वर्ग-४’साठी ४५ वर्षे पूर्ण व ५५ वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी ‘दैनंदिन कामे सुरळीत पार पाडू शकत नाही,’ अशा आशयाचे शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती त्यांच्या पाल्यासाठी विद्युत सहायक पदावरील विकल्प शाबूत ठेवून घेत आहेत, त्यांनी त्यांच्या पाल्याची शैक्षणिक माहिती देणेही गरजेचे आहे. यासाठी पाल्य दहावी, बारावी उत्तीर्ण, इलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जे कर्मचारी आपल्या पाल्यांना नोकरीचा विकल्प न ठेवता या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना या योजनेनुसार सेवा झालेल्या प्रत्येक वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार आणि विहीत सेवानिवृत्तीपूर्वी राहिलेल्या प्रत्येक वर्षासाठी २५ दिवसांचा पगार, अशा सूत्रानुसार एकूण लाभ मिळणार आहे. हा लाभ एकूण जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे.
अशा उमेदवारांना सुरुवातीला तीन वर्षांच्या कंत्राटाच्या कालावधीसाठी ७५०० रुपये प्रतिमहा एकत्रित वेतन मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर त्यांना ‘विद्युत सहायक’ या पदावर नेमण्यात येणार आहे. जे पाल्य तीन वर्षांच्या कालावधीत इलेक्ट्रीकल अथवा वायरमनचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण करू शकले नाहीत तर त्यांना दिलेले एकत्रित वेतन या योजनेनुसार मिळणाऱ्या एकूण रकमेतून वजा करून उर्वरित रक्कम संबंधित कर्मचाऱ्यास अदा करण्यात येईल. या रकमेवर व्याज देण्यात येणार नाही अथवा या कर्मचाऱ्यास पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पाल्याच्या नोकरीसाठी या योजनेत वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे (मागास उमेदवारासाठी ५ वर्षे शिथिल) अशी आहे.