जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:14+5:302021-07-15T04:17:14+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे निवृत्तिवेतन जुलैचा अर्धा महिना ...

Retirement of Zilla Parishad employees stalled | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन रखडले

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन रखडले

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे निवृत्तिवेतन जुलैचा अर्धा महिना संपला तरीही मिळालेले नाही. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने निवेदनाद्वारे ही वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.

हजारोंच्या संख्येने असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनामध्ये सातत्याने अनियमितता आहे. मे २०२१ चे निवृत्तिवेतन १२ जूननंतर मिळाले. तर जुलै २०२१ चे निवृत्तिवेतन अजूनही मिळालेले नाही. याबाबत संघटनेच्यावतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तथापि राज्य शासनाकडून वेळेवर अनुदान येत नसल्याने निवृत्तिवेतन अदा करण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन कोषागारामार्फत अदा करण्यात येते आणि कोरोनाच्या काळातही त्यासाठी विलंब होत नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र पुढचा महिना संपला तरी वाट पाहावी लागते. यासाठी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार करूनही शासन लक्ष देत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण आणि कुचंबणा होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष विश्वास साबळे आणि सचिव एम. ए. देसाई यांनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

चौकट

जिल्हा परिषदेतील निवृत्त प्राथमिक शिक्षक ७६२४

सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी २९५२

एकूण १०५७६

कोट

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवा निवृत्तीचे अनुदान आले असून, ते जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनुदान आलेले नाही. याआधी वेळप्रसंगी जि. प. स्वनिधीतून निवृत्तिवेतन अदा करण्यात येत होते. परंतु केंद्र सरकारने त्याच लेखाशीर्षामधून निधी काढण्याबाबत आदेश दिल्याने आता शासनाकडून अनुदान आल्यानंतरच ते जमा करण्यात येणार आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-राहुल कदम, प्रभारी मुख्य व लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: Retirement of Zilla Parishad employees stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.