कारखान्यांचे १ कोटी परत, शेतकरी निवासासाठी घेतली होती रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:14 AM2017-10-26T05:14:11+5:302017-10-26T05:14:15+5:30
कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार १२ कारखान्यांना आरटीजीएसद्वारे ही रक्कम परतही करण्यात आली आहे. ‘लोकमत’मध्ये १२ आॅक्टोबरच्या अंकात त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद झाले होते. त्याची दखल घेऊन पैसे परत करण्याची प्रक्रिया त्याच दिवसापासून गतीने करण्यात आली.
पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या ७ एकरांवर साखर संकुलाची उभारणी करण्यात आली. तीन एकरांवर शेतकरी निवास, अधिकारी निवासस्थाने व कारखान्यांसाठी कक्ष बांधण्यात येणार होते. त्यासाठी मंत्री समितीच्या २००५च्या बैठकीत कारखान्यांकडून निधी जमा करण्याचा निर्णय झाला. देखभालीसाठी म्हणून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापना करण्यात आली; परंतु कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार दिला. ज्या कामासाठी ट्रस्टची स्थापना केली ते कामच न राहिल्याने ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला; २००५पासूनचे लेखापरीक्षणाचे अहवाल व चेंज रिपोर्ट सादर करण्याची सूचना धर्मादाय आयुक्तांनी केली. ती प्रक्रिया सुरू आहे. त्याचदरम्यान ९ आॅगस्ट २०१७ला कारखान्यांचा निधी परत करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले; प्रत्यक्षात पैसे परत दिलेले नव्हते.
‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच साखर आयुक्त कार्यालयातून संबंधित कारखान्यांना फोन आले व कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली.
>व्याजाची अडचण
ट्रस्ट स्थापन करताना त्याला सामाजिक कारणावरून आयकर सवलत मिळाली होती; तो उद्देशच पूर्ण न झाल्याने जमा केलेल्या निधीवर आयकर विभागास तब्बल एक कोटी रुपये भरावे लागले. त्यामुळे कारखान्यांना फक्त मुद्दलच परत करण्यात येत आहे.