अखेर परदेशी फुटबॉलपटूंचे परतीचे तिकीट कन्फर्म, दिल्लीला निजामुद्दीनने रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 06:51 PM2020-06-20T18:51:18+5:302020-06-20T18:52:54+5:30
लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेले केनियन फुटबॉलपटू डेव्हिड, ओला (शिवाजी तरुण मंडळ), लावेल, जोन्सन (बी.जी.एम. स्पोर्टस) हे शुक्रवारी (दि. १९)ला केनियाला जाण्यासाठी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे कोल्हापुरात अडकलेले केनियन फुटबॉलपटू डेव्हिड, ओला (शिवाजी तरुण मंडळ), लावेल, जोन्सन (बी.जी.एम. स्पोर्टस) हे शुक्रवारी (दि. १९)ला केनियाला जाण्यासाठी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.
कोरोनाच्या संकटकाळात कोल्हापूरचाफुटबॉल हंगाम महापौर चषकदरम्यान अर्धवट स्थितीत संपला. याच काळात सरकारने रेल्वे, विमानसेवा बंद केल्यामुळे परदेशी नागरिकांना आपापल्या देशांत जाण्यावर निर्बंध आले. त्याचाच फटका कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाकडून करारबद्ध झालेल्या केनियाच्या ओला व डेव्हिड, तर बी. जी. एम. स्पोर्टसकडून खेळणाऱ्या लावेल आणि जोन्सन या चार फुटबॉलपटूंना बसला.
हे चारीही खेळाडू सहा महिन्यांच्या व्हिसावर कोल्हापुरात या दोन संघांकडून करारबद्ध झाले होते. त्यांचा करार जूनच्या पहिल्या आठवड्यात संपत होता. मात्र, केनियाला जाण्यासाठी त्यांना तिकीट उपलब्ध होत नव्हते. चारीही खेळाडूंनी नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केनियाला जाण्यासाठी तिकिटाचे आरक्षण केले होते. मात्र, दोन वेळा ते रद्द झाले. त्यानंतर पुन्हा प्रयत्न करून अखेरीस सोमवार (दि. २२) विमानाचे तिकीट निश्चित झाले. त्यानुसार चौघेजण शुक्रवारी निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले.
या खेळाडूंची गेले तीन महिने शिवाजी तरुण मंडळाचे प्रशिक्षक विशाल बोंगाळे, शिवतेज खराडे, निखिल कोराणे, तर बी. जी. एम.तर्फे अभिजित राऊत, इंद्रजित गायकवाड, विशाल माळी, स्वप्निल निकम यांनी उत्कृष्ट व्यवस्था केली होती.