‘वीकेंड लॉकडाऊन’ला फिराल, तर वाहन जप्तीसह कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:20+5:302021-04-08T04:25:20+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवार व रविवारी होणाऱ्या वीकेंड लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासनाकडून दोन हजार पोलीस तैनात करण्यात येत ...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवार व रविवारी होणाऱ्या वीकेंड लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासनाकडून दोन हजार पोलीस तैनात करण्यात येत आहेत. चौकाचौकांत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, वीकेंड लॉकडाऊनसाठी पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनासाठी बुधवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. तिरुपती काकडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीम आखली आहे. सध्या रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जमावबंदी केली आहे. नियमांची अंमलबजावणी व कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्री गस्त, नाकाबंदी सुरू केली आहे. शनिवार व रविवारी होणाऱ्या वीकेंड लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हे लॉकडाऊन राहणार आहे. पेट्रोल पंप, दवाखाने, मेडिकलसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात चौकाचौकांत, प्रमुख नाक्यांवर बॅरिकेडस् लावून नाकाबंदी केली जाणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.
शहरात नऊ ठिकाणी नाकाबंदी
शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावर बॅरिकेडस् लावून वाहने अडवून त्यांची तपासणी होणार आहे. तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर आदी ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांनाच फिरता येणार आहे.
१,५०० पोलीस, ५०० होमगार्ड, २५ स्ट्राइकिंग फोर्स
जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांसह एकूण १२५ पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी होत आहेत. १,५०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड, राज्य राखीव दलाची दोन पथके, २५ स्ट्राइकिंग फोर्स, असा बंदोबस्त तैनात केला आहे.
...येथे राहणार विशेष लक्ष
कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह, करवीर तालुका, जयसिंगपूर, हातकणंगले, वडगाव याठिकाणी पोलीस दलाचे विशेष लक्ष राहणार आहे.