ए.एस. ट्रेडर्सचे परतावे झाले बंद, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, कंपनीच्या प्रमुखाचा व्हिडीओ व्हायरल
By विश्वास पाटील | Published: November 23, 2022 10:04 AM2022-11-23T10:04:25+5:302022-11-23T10:24:54+5:30
Kolhapur: कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे.
- विश्वास पाटील
कोल्हापूर - कंपनी सध्या आर्थिक अडचणीतून जात असल्याने गुंतवणूकदारांचे परतावे थांबवण्यात येत असल्याची जाहीर कबुली ए. एस. ट्रेडर्ससह विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक व ओनर लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. सांगली) यांनी दिली आहे. त्यासंबंधीचा त्यांचा स्वत:चा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. परतावे बंदच्या घोषणेमुळे लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.
सुमारे अडीच मिनिटांच्या अर्धवट व्हिडीओमध्ये सुभेदार यांनी कंपनीसमोरील अडचणी मांडल्या आहेत. त्यात ते म्हणतात, गेले काही दिवस परतावे देण्यात विलंब होत होता. परंतु, आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की परतावे (रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट) थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. आपला निधी इक्विटीमध्ये सुरक्षित आहे. आजच्या घडीला ही कंपनी चालवायची की बंद करायची असा विचार माझ्या मनात घोळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ८ ते १० हजार गुंतवणूकदारांची झूम बैठक घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेऊ.
सुभेदार आजारी होते तर मग दुबईला कसे गेले, वेब मीटिंगला स्कीनवर दिसत होते तर मग ऑनलाईन शेअर ट्रेडिंग का केले नाही..? त्यांनी किती कंपन्यांची नोंदणी सेबीकडे केली आहे..? कंपनीचे कोणते खाते सेबीकडे सुरू आहे..? त्याचा पुरावा त्यांनी द्यावा, अशी मागणी एलएलपी विरोधी कृती समितीने केली आहे. या कंपनीने एक रुपयाचाही शेअर खरेदी केलेली नाही मग कोणत्या इक्विटीमध्ये पैसे अडकले, हे जाहीर करावे. गेल्या सहा महिन्यांत शेअर मार्केट वधारले असताना यांच्याच कंपनीला कसा तोटा झाला आणि परतावे थांबवण्याचा निर्णय कोणत्या कायद्यानुसार घेतला, अशी विचारणा समितीने केली आहे.
पैसे द्यायला रांग का लागली..?
ही कंपनी एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिन्याला तीन हजार रुपये परत देत असे. तीन वर्षांनंतर मूळ मुद्दलही परत मिळणार होती. हा बिझनेस जे लोक देतात त्यांना साखळीमधील गुंतवणुकीवरही वेगळे कमिशन मिळत होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ची तर गुंतवणूक केलीच शिवाय लोकांना यामध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले. एकाचे बघून एकाने पैसे गुंतवले. त्यातील काहींना लाभ झाला..बरेचसे आता अडकले.
करवीर पूर्व भागात गुंतवणूक
या कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. मुख्यत: करवीर तालुक्यातील बीडशेड, आरे, बीड, सावरवाडी, बहिरेश्वर, गणेशवाडी, माळ्याची शिरोली, कोपार्डे, शिंदेवाडी या गावांतून या कंपनीत काही कोटींमध्ये गुंतवणूक झाली आहे. लोकांनी बँकांतील ठेवी मोडून, सोने तारण ठेवून यामध्ये गुंतवणूक केली आहे. व्यापारी, दुकानदार, शिक्षक, छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी रक्कम गुंतवली आहे.