तुमच्यातील सर्वोत्तम प्रकट करणे म्हणजे शिक्षण - : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:42 AM2019-06-20T00:42:40+5:302019-06-20T00:44:42+5:30

मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो.

To reveal the best of you is to: Education -: The Voice of Honor | तुमच्यातील सर्वोत्तम प्रकट करणे म्हणजे शिक्षण - : मान्यवरांचा सूर

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात मंगळवारी बारावीच्या परीक्षेमध्ये लख्ख यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ‘लोकमत,’ डाईस अकॅडमी आणि ओम सायन्स अकॅडमी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अभय भंडारी, दिशा पाटील, शशिकांत कापसे, वसंतराव देशमुख, गीता पाटील, नितीन वाडीकर उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात दहावीच्या परीक्षेमध्ये लख्ख यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’, डाईस अकॅडमी आणि ओम सायन्स अकॅडमीतर्फे दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्याच्यामूलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय, असा मोलाचा सल्ला मंगळवारी (दि.१८) दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिला.

दहावी-बारावीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘लोकमत, ‘डाईस अकॅडमी’ आणि ‘ओम सायन्स अकॅडमी’ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. हे सत्कार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रेरणादायी वक्ते अभय भंडारी, ‘लोकमत’चे वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, डाईस अकॅडमीच्या दिशा पाटील, ओम सायन्स अकॅडमीचे संचालक सविता शशिकांत कापसे, वसंतराव देशमुख हायस्कूलचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, सिम्बॉलिक स्कूलच्या प्रिन्सिपल गीता पाटील, न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे व्हाईस चेअरमन नितीन वाडीकर यांच्या हस्ते झाले.

अभय भंडारी म्हणाले, शिक्षणाच्या आणि संस्कार, मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही. त्यासाठी समाजच कारणीभूत आहे. आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधनसामग्रीपर्यंत पोहोचलो आहोत. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे.

डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनविण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात; त्यामुळेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण घेतले पाहिजे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता पाहून अभ्यासक्रम निवडावा. प्रत्येकाने करिअर निवडताना स्वत:ची कौशल्ये, आवड-निवड, क्षमता यांचा विचार करून करिअर निवडावे. आज अनेक नवी क्षितिजे तुमच्यापुढे आहेत. आमच्या काळी त्यांना मर्यादा होती, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

दिशा पाटील म्हणाल्या, पालकांनी पाल्यांना बारावीनंतर स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची मुभा द्या. हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करणे गरजेचे आहे. शैक्षणिकसोबत आयुष्यात यशस्वी होणे गरजेचे आहे. करिअर निवडल्यानंतर जिद्द, चिकाटीसह त्या क्षेत्रांतील परिपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी सदैव प्रयत्न करावेत. पालकांनी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:ला समाधान देणारे करिअर निवडावे; म्हणजे त्याच्या अभ्यासामध्येही गोडी लागते. यासह त्यांनी करिअरच्या विविध संधींची सविस्तर माहिती दिली.

प्रा. शशिकांत कापसे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी परीक्षेच्या काळात घरातील वातावरण आनंददायी ठेवावे. करिअर निवडीची सर्व मुभा पाल्यांकडे द्यावी. पालकांनी त्यांचे मार्गदर्शक व्हावे; मात्र आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नयेत. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडीनिवडी, क्षमता ओळखणे गरजेचे आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जान्हवीचा विशेष सत्कार

घरीच अभ्यास करीत कोल्हापुरातील जान्हवी देशपांडे या विद्यार्थिनीने होम स्कूलिंगचा प्रयोग यशस्वी करून दहावीत ८४ टक्के गुण मिळविल्याबद्दल जान्हवीचा विशेष सत्कार करण्यात आला. यासह आयआयटी मेन्समध्ये निवड झाल्याबद्दल आर्यन बसंतानी, यंग सायंटिस्ट म्हणून सिल्व्हर मेडल मिळविल्याबद्दल केविन लालवानी, सभागृहात उपस्थित असलेल्या दहावी-बारावीमधील टॉपरपैकी मानसी विजय पोतदार, अभिमान गुरुबाळ माळी, गौरव शशिकांत कापसे यांचा सत्कार करण्यात आला.

सभागृह हाऊसफुल्ल
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा दुपारी चार वाजता होता; परंतु तत्पूर्वीच सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. सोहळ्यात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत ‘विज्ञान शाखेत करिअरची संधी’ याबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल पालक व विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
 

मनातील शंका दूर
डाईस अ‍ॅकॅडमीच्या डायरेक्टर दिशा पाटील, ओम सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा. शशिकांत कापसे यांनी मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या. कार्यक्रम संपताच दोघांनीही पालक आणि विद्यार्थ्यांची भेट घेऊन शंका दूर केली.

सेल्फीसाठी गर्दी
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर त्यांनी मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फोटो काढण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही. त्यांच्यासोबत फोटोसाठी गर्दी केली.





 

Web Title: To reveal the best of you is to: Education -: The Voice of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.