बदला म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरांत चोरी-कळंबा कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 07:26 PM2019-04-17T19:26:38+5:302019-04-17T19:27:28+5:30
कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील निवासस्थानांत चार घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोणाज, ता. मंगळवेढा, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहासमोरील निवासस्थानांत चार घरफोड्या करणाºया सराईत चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोणाज, ता. मंगळवेढा, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना अधिकारी व महिला कर्मचाºयांनी आपणाला खूप त्रास दिला होता. कारागृहाबाहेर कामे करीत असताना त्यांची घरे हेरून ठेवली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर सोलापूरहून चार वेळा कोल्हापुरात येऊन बदला घ्यायचा म्हणून त्यांची घरे फोडून चोरी केली, अशी कबुली संशयित केदार याने दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे सोने, टीव्ही असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक माहिती अशी, मंगळवेढा, चडचण आणि सांगली या ठिकाणी चोरी, तरुणींचे अपहरण करून अत्याचार, दहशत अशा प्रकारचे गुन्हे दाखल असणारा राजेंद्र केदार याला एका गुन्ह्यात २००५ साली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो कळंबा कारागृहात होता. कारागृहात असताना त्याच्याकडून झाडांना पाणी घालणे, वस्तूंची ने-आण, शेतात कामे करणे अशी कामे करून घेतली जात होती. त्याला कारागृह उपनिरीक्षक महादेव दशरथ होरे, कॉन्स्टेबल रूपाली लालचंद नलवडे, संगीता चव्हाण, वैशाली सदाशिव पाटील यांनी त्रास दिला होता. याचा त्याला राग होता. काम करण्यासाठी बाहेर जाताना त्याने कारागृहाच्या परिसरातील या अधिकाºयांसह कर्मचाºयांची निवासस्थाने हेरून ठेवली होती. डिसेंबर २०१८ मध्ये तो कारागृहातून बाहेर पडला. त्यानंतर तो गावी गेला. आपणाला त्रास दिल्याचा बदला घेण्यासाठी तो सोलापूरहून कोल्हापुरात आला. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालवधीत त्याने चौघा
कर्मचाºयांची घरे फोडून मुद्देमाल लंपास केला.
कारागृह निवासस्थानी एक नव्हे चार चोºया झाल्याने पोलीस चक्रावून गेले होते. चोरट्याचा शोध घेत असताना कारागृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये संशयित केदार संशयितरीत्या फिरताना दिसून आला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी हनी ट्रॅप लावला होता. पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीचा शोध घेऊन, तिला फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. तिने ‘माझ्याकडे पैसे नाहीत. मला कामानिमित्त पैशांची गरज आहे. तू सांगली बसस्थानकावर ये,’ असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याचे ताब्यातून एलईडी टीव्ही, दुचाकी, १५ तोळे सोन्याचे दागिने, आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, उपनिरीक्षक अविनाश माने, डी. बी. पथकाचे सचिन देसाई, अमित सुळगावकर, परशुराम गुजरे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, एकनाथ चौगुले, हणमंत कुंभार, बजरंग लाड, प्रदीप पाटील, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे यांनी केली.
महिला कॉन्स्टेबलला खुनाची धमकी
संशयित राजेंद्र केदार याने कारागृहाच्या महिला कॉन्स्टेबल वैशाली पाटील यांच्या घरात चोरी केली. त्यावेळी पाटील ड्यूटीवर होत्या. त्यांचा फोन नंबर मिळवून केदारने फोन करून ‘तुमच्या घरात मी चोरी केली. जर तुम्ही सापडला असता तर तुमचा खून करणार होेतो,’ अशी धमकी त्याने दिली होती. त्याने फोन केल्यामुळेच पोलिसांना त्याच्याविरोधात थेट पुरावा मिळाला.