महसूलचा महापालिकेला पुन्हा दणका; कुरघोड्यांचे राजकारण
By admin | Published: September 15, 2014 12:35 AM2014-09-15T00:35:05+5:302014-09-15T00:36:00+5:30
कर्मचाऱ्यांसह वाहनताफा घेणार दिमतीला : महापालिकेतील नव्वद टक्के वाहनाचा ताफा मागवला
कोल्हापूर : महसूल विभागाने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणूक कामासाठी महापालिकेतील उपलब्ध ३५हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. महापालिकेतील ९०टक्के वाहनांचा ताफाही महसूलच्या दिमतीला मागितला आहे. फौजदारी गुन्ह्याची भीती दाखवत महसूलने महापालिकेवर कुरघोडी केल्याची भावना व्यक्त होत आहे. अतिरिक्त कर्मचारी नसल्याने याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
महापालिकेत विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत यावर्षीच्या महसूल उत्पन्नात मोठी तूट येण्याची भीती लेखा विभागाने व्यक्त केली आहे. स्थानिक संस्था कर, घरफाळा, परवाना, पाणीपट्टी या विभागांना ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने मोठ्या प्रमाणात पुन्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी जुंपले जाणार आहे. याची धास्ती अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.
आचारसंहिता लागू होताच महापालिकेचे दोन्ही उपायुक्त, दोन्ही सहायक आयुक्त, चारपैकी तीन शहर उपअभियंता, सर्वच्या सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व सर्व्हेअर, मुख्य आरोग्य निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक ७, वरिष्ठ लिपिक २५ व शिपाई १० असे तब्बल ८०हून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बीएलओ कामासाठी २४० हून अधिक कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्याचे फर्मान आले आहे.
महापालिकेतील आयुक्तानंतरची सर्व फळी निवडणुकीच्या कामात
पुन्हा गुंतवली जाणार आहे.
परिणामी महापालिकेचे दैनंदिन कामकाज मोठ्या प्रमाणात
खोळंबणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. कार्यालयीन खोळंब्यामुळे नागरिकांच्या रोषास महापालिकेला सामोरे
जावे लागणार आहे.
(प्रतिनिधी)
उपायुक्त २
सहायक आयुक्त २
उपशहर अभियंता ३
सहा.व कनिष्ठ अभियंता १८
सर्व्हेअर - ६
मुख्य आरोग्य निरीक्षक - १
आरोग्य निरीक्षक- ४
अधीक्षक- ७
लिपिक- २५
शिपाई-१०
महसूलचा शिपाईही चारचाकीतून
मागील वेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने महसूलच्या शिपायांनी टपाल वाटपासाठी वापरल्याची उदाहरणे आहेत. महसूलचे कर्मचारी ‘इलेक्शन’च्या नावाखाली झेरॉक्स आणायलाही चारचाकीचा वापर करताना दिसतात. यंदा पोलिसांच्या वाहतुकीसाठीही महापालिकेची वाहने वापरली जाणार आहेत.
वाहनांची दुरवस्था
अतिरिक्त म्हणून घेतलेली महापालिकेची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडाखाली धूळ खात पडतात. इतर वाहनेही दिवसभर वापरून, रात्री वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उघड्यावरच थांबून असतात. ही वाहने धुवायची म्हटली तर तेथे पाण्याची सोय नाही. या वाहनांना अवकळा येते. टाकी भरून दिलेली डिझेल वाहने परत करताना जेमतेम दोन-तीन लिटरच डिझेल भरून परत केली जातात.
वाहनांची दुरवस्था
अतिरिक्त म्हणून घेतलेली महापालिकेची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडाखाली धूळ खात पडतात. इतर वाहनेही दिवसभर वापरून, रात्री वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उघड्यावरच थांबून असतात. ही वाहने धुवायची म्हटली तर तेथे पाण्याची सोय नाही. या वाहनांना अवकळा येते. टाकी भरून दिलेली डिझेल वाहने परत करताना जेमतेम दोन-तीन लिटरच डिझेल भरून परत केली जातात.