चोकाक-अंकली रस्त्यासाठी शेतकऱ्यांना चौप्पट मोबदला, नवीन प्रस्ताव देण्याचे मंत्री बावनकुळे यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:51 IST2025-04-10T11:50:33+5:302025-04-10T11:51:07+5:30
कोल्हापूर -मुंबई : चोकाक ते अंकली रस्त्यासाठी भूसंपादनासाठी गुणांक २ नुसार (चौपट भरपाई) भरपाई देण्याचा नवीन प्रस्ताव कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ...

चोकाक-अंकली रस्त्यासाठी शेतकऱ्यांना चौप्पट मोबदला, नवीन प्रस्ताव देण्याचे मंत्री बावनकुळे यांचे आदेश
कोल्हापूर-मुंबई : चोकाक ते अंकली रस्त्यासाठी भूसंपादनासाठी गुणांक २ नुसार (चौपट भरपाई) भरपाई देण्याचा नवीन प्रस्ताव कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, तो केंद्र शासनाकडून तातडीने मंजूर करून घेण्याची आमची तयारी आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे या रस्त्याचे गेली अनेक दिवस रखडलेले काम मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली.
कोल्हापूर आणि सांगली, या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्रमांक १६६) भूसंपादनाची चाेकाक ते अंकलीदरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी, असे आदेशही या बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया लांबली होती. या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी चौपट मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा तो मान्यतेसाठी पाठविला जाईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र यड्रावकर, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, या रस्त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक १ होता तो आता गुणांक २ करण्यात यावा. अशा पद्धतीने प्रस्तावानुसार या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. सरकार म्हणून तातडीने निर्णय घेण्याची आमची तयारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अत्यंत सकारात्मक पद्धतीने सरकारची कामगिरी सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत योग्य निर्णयापर्यंत आपण पोहचू.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढा दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींना वेगवेगळे दर देण्याचा निर्णय अन्यायकारक होता. हा अन्याय दूर करून आता शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळवून देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाल्याने लवकरच शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खासदारांनी मानले आभार
खासदार धैर्यशील माने म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरही कोणतीही अडचण न येता हा प्रश्न ३० मिनिटांच्या बैठकीत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे उपस्थित आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
दृष्टिक्षेपात महामार्ग...
- चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, उमळवाड व उदगाव ही दहा गावे या महामार्गात येतात.
- त्याचे अंतर ३३.५ किलोमीटर आहे.
- रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग २०२१ला मंजूर झाला. २०२३ मध्ये ही दहा गावे या राष्ट्रीय महामार्गामध्ये समाविष्ट करण्यात आली. या महामार्गांतर्गत १६९ एकर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याच्या शेतकऱ्यांना आता नागपूर-रत्नागिरी महामार्गातील भूसंपादनाप्रमाणे चौपट भरपाई मिळण्याचे आश्वासन मिळाले आहे.