‘देवाचा डोंगर’ला महसुली दर्जा
By admin | Published: April 25, 2017 11:00 PM2017-04-25T23:00:27+5:302017-04-25T23:00:27+5:30
ग्रामस्थांकडून मंजुरी : प्रशासकीय हालचाली गतिमान; पंकजा मुंडे, महादेव जानकर आज भेट देणार
शिवाजी गोरे ल्ल दापोली
चार तालुके व दोन जिल्ह्यांच्या सीमावादात अडकलेल्या ‘देवाचा डोंगर’ या अतिदुर्गम वस्तीला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठीच्या प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. चार तालुक्यांमध्ये विखुरलेल्या चार वस्त्या एकत्र आणून त्याचे महसुली गाव केले जाणार असून, त्याला ग्रामस्थांकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून सातत्याने या गावाच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यात आला आहे. त्या लढ्याला आता यश आले आहे. उद्या बुधवारी मंडणगड दौऱ्यावर येणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच महादेव जानकर या गावाला भेट देणार आहेत.
देवाचा डोंगर या गावातील चार वाड्या दोन जिल्ह्यांमधील चार तालुक्यांमध्ये विखुरल्या गेल्या आहेत. दापोली तालुक्यातील जामगेवाडी (देवाचा डोंगर), मंडणगड तालुक्यातील भोळवलीवाडी (देवाचा डोंगर), खेड तालुक्यातील तुळशीवाडी (देवाचा डोंगर), रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ताम्हाणेवाडी (देवाचा डोंगर) अशा या चार वाड्या चार ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट आहेत. मात्र, पुरेसा निधी या वाड्यांपर्यंत पोहोचलेला नाही. हे गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक महसुली गाव आणि त्याच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची आवश्यकता आहे. या गावाची पाण्याची मूलभूत समस्याही इतक्या वर्षात सुटलेली नाही. सर्वांत प्रथम या डोंगरावरच पाण्याची टंचाई जाणवू लागते आणि तरीही हे गाव दुर्लक्षित आहे.
आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयाची दखल घेतली असून, या वाड्यांची पाहणी करून एक महसुली गाव करण्याबाबतची आवश्यक ती प्रक्रिया करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना दिली आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
गेली नऊ वर्षे ‘देवाचा डोंगर’च्या विविध समस्या ‘लोकमत’ने मांडल्या आहेत. त्याची दखल आता शासन स्तरावर घेण्यात आली आहे. राष्ट्रीय भटक्या आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी लोकमतच्या वृत्ताची दाखल घेऊन ‘देवाचा डोंगर’चा महसुली सीमावाद मिटविण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पर्यटन दर्जा केवळ कागदावरच
डोंगरावरील शंकराच्या मंदिरामुळे देवाचा डोंगर असे नाव येथील वस्तीला मिळाले. या गावाला पर्यटनाचा ‘क’ दर्जा मिळाला मात्र, या पर्यटनस्थळापर्यंत अजून एस. टी. बसही पोहोचलेली नाही. पर्यटनाचा दर्जा केवळ कागदावरच देण्यात आला आहे.
आज मंत्रिगण भेट देणार
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असून, या गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री महादेव जानकर व मुंडे येथील वाड्यांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत .
पंकजा मुंडे यांच्या रूपाने प्रथमच या गावाची कोणी मंत्री भेट देणार आहे. त्यामुळे त्या काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्री महादेव जानकर यांच्याकडूनही खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.