सुधारीत....जिल्हा बँक ठराव सोमवारपासून गोळा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:55+5:302021-01-15T04:19:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : सहकारी निवडणूक प्राधीकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया साेमवार (दि. १८) पासून सुरू करण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : सहकारी निवडणूक प्राधीकरणाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया साेमवार (दि. १८) पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा बँकेचे उर्वरित ठराव गोळा करण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालय सोमवारपासून सुरुवात करणार आहे. ‘गोकुळ’च्या ठरावांवर हरकती व सुनावणीची प्रक्रिया झाली आहे. पुढील प्रक्रियेसाठी दुग्धविभागाला आदेशाची प्रतीक्षा आहे.
सहकार प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय सहनिबंधक कार्यालयाने जिल्हा बँकेची निवडणुकीचे उर्वरित ठराव गोळा केले जाणार आहेत. बँकेचे ११ हजार ३३५ संस्था सभासद असून त्यातील ७ हजार १७५ ठराव दाखल झाले आहेत. त्यापैकी विकास संस्थांचे १८४० ठराव आहेत. ठराव दाखल करण्यासाठी सोमवारपासून चार दिवस दिले जाणार आहेत. ‘गोकुळ’च्या दाखल ठरावांवरील हरकती पूर्ण झाली आहे. आता प्रारूप यादी तयार केली जाणार असलीतरी अद्याप दुग्धविभागाच्या पातळीवर काहीच हालचाली नाहीत.
निवडणुकांना राजकीय अडचण
नवी मुंबई, कोल्हापूरसह इतर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या घाईत शिखरसंस्थांच्या निवडणुका नको, असा दोन्ही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह आहे. त्यामुळेच सर्वच निवडणुका मार्च २०२१ पर्यंत पुन्हा लांबणीवर टाकाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी दिवसभर याबाबत सत्तारूढ गटांत खलबते सुरू होते.
कायदा काय सांगतो...
सहकार कायद्यानुसार एखाद्या संचालक मंडळास जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ देता येते. आता मुदतवाढीची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ द्यायची म्हटले तर नवीन वटहुकूम काढावा लागेल, राज्य सरकार तो काढेलही. मात्र, त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी गरजेची आहे.