(सुधारीत) गोकूळला मुंबईत सिडकोची पाच एकर जागा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:39+5:302021-06-04T04:19:39+5:30
कोल्हापूर : सत्तातरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टीमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी ...
कोल्हापूर : सत्तातरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टीमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकाेकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महानंदकडून थकीत पावनेदोन कोटीही देऊ केले. प्रकल्प अनुदानासाठीचा फेरप्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने तातडीने पाठवा, अर्थखाते त्याला मंजुरी देईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन निकालाची माहिती दिली.
गोकूळ दूध संघात तब्बल तीस वर्षांनंतर घडलेल्या सत्तांतरानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेत्तृत्वाखालील जम्बो गोकूळ टीमने गुरुवारी मुंबई दाैरा केला. यात खासदार संजय मंडलीक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, शशिकांत चुयेकर, नविद मुश्रीफ, बयाजी शेळके, बाबासोा चौगले, कर्णसिंह गायकवाड, रणजित पाटील, अजित नरके, अभिजित तायशेटे, एस. आर. पाटील, किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत गोकूळकडून मुंबईत मार्केटिंगसाठी १० एकर जागेची मागणी करण्यात आली. पण यातील पाच एकर जागा उपलब्ध होईल, असे सांगून पवार यांनी सिडकोचे अधिकारी मुखर्जी यांच्याशी तातडीने फोनवरून संपर्क साधत जागा निश्चित करण्याच्या सूचनाही दिल्या. प्रकल्प उभारणीसाठीच्या अनुदानाचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रश्नही शिष्टमंडळाने पवार यांच्या निदर्शनास आणून दिला. यावरही त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून फेरप्रस्ताव तयार करुन घ्या, पुढील तरतुदीचे मी बघतो, असे सांगून हा देखील विषय निकाली काढला.
शेतकऱ्यांना चार पैसे जास्तच द्या : मुख्यमंत्री
गोकूळच्या या टीमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुपारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळवलेल्या यशाचे कौतुक करतानाच त्यांनी चोख कारभारातून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त मिळतील असा कारभार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकट
गोकूळचे मुंबईतील प्रस्थ वाढणार
गोकूळ दूध संघाकडून मुंबईत प्रतिदिन ७ लाख लिटरची विक्री होते. मुंबईत गोकूळची स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे यातील ३ लाख लिटर दूध इतर खासगी संस्थांकडून पॅकिंग करून घ्यावे लागते. आता पाच एकर जागा मिळाल्यास तेथे गोकूळचे हक्काचे मार्केटिंग केंद्र, कोल्ड स्टोरेज उभे राहू शकणार आहे. दुधासह इतर उपपदार्थाची विक्री करणे सुलभ होणार आहे.
चौकट
वितरकांचीही बैठक
मुंबईत पाच एकर जागा उपलब्ध होण्याच्या दिशेने सकारात्मक चर्चा झाल्याने लागलीच अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मुंबईतील वितरकांची एकत्रित बैठक घेतली. मुंबईत गोकूळच्या म्हैस दुधाला जास्त मागणी आहे, पण आता गाय दूध व इतर उपपदार्थ विकण्यासाठीही प्रयत्न करा, आम्ही सर्व पाठबळ देऊ, असे आश्वासन दिले.
चौकट
अशीही एक आठवण
गोकूळ ही सरकारी डेअरी नसतानाही देखील त्यांना मुंबईत दूध विक्रीस शरद पवार यांच्यामुळे परवानगी मिळाली होती, ही आठवण करून देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी गोकूळ ही नावाजलेली संस्था असल्याने आता राज्यातील संघ म्हणून मार्केटिंगमधील पाया भक्कम करण्यासाठी त्यांच्या मागण्या सकारात्मकतेने घ्या, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चौकट
पवार यांनाही उत्सुकता..
गोकूळमध्ये घडलेल्या या सत्तांतरामागचे गुपित जाणून घेण्याची कुतूहलता उपमुख्यमंत्री पवार यांनाही होती. त्यांनी कोण नेते कोणासोबत होते, कशा जोडण्या लावल्या याबाबत विचारणा करत यशाबद्दल कौतुकही केले आणि पुढील वाटचालीस मदतीची ग्वाही दिली.
चौकट
गोकूळमधील सत्ताधारी आणि राज्यातील सत्ताधारी एकच असल्यामुळे आता बऱ्याच वर्षांपासूनचे रखडलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग खुला झाला आहे.
फोटो : ०३०६२०२१-कोल-गोकूळ ०१
फोटोओळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकूळ) सत्तारुढ संचालक व त्यांचे नेते अशा जम्बो शिष्टमंडळाने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व संघाच्या हिताच्या मागण्या मंजूर करून घेतल्या.
फोटो : ०३०६२०२१-कोल-गोकूळ ०२
फोटोओळ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.