(सुधारीत) गोठ्याच्या जागेसाठी वरणगेत चुलत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:47+5:302021-06-06T04:17:47+5:30

कोल्हापूर/ प्रयाग चिखली : सामाईक जागेत जनावरांचा गोठा बांधत असल्याच्या कारणांवरून पुतण्याने धारदार चाकूने सपासप भोसकून चुलत्याचा निर्घृण खून ...

(Revised) Murder of a cousin in Varanasi for a barn space | (सुधारीत) गोठ्याच्या जागेसाठी वरणगेत चुलत्याचा खून

(सुधारीत) गोठ्याच्या जागेसाठी वरणगेत चुलत्याचा खून

Next

कोल्हापूर/ प्रयाग चिखली : सामाईक जागेत जनावरांचा गोठा बांधत असल्याच्या कारणांवरून पुतण्याने धारदार चाकूने सपासप भोसकून चुलत्याचा निर्घृण खून केल्याची घटना करवीर तालुक्यात वरणगे येथे शनिवारी सकाळी घडली. भगवान रामचंद्र बुचडे (वय ५५, रा. मातंग वसाहत, वरणगे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेमुळे गावात खळबळ उडाली. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवरील हल्ल्यात सशस्त्र हल्ल्यात दोन पुतणेही गंभीर जखमी झाले. हल्ल्यात गुप्ती, तलवार, कुऱ्हाड, काठ्या, दगड यांचाही वापर केला.

विकास ऊर्फ नाना भैरवनाथ बुचडे (वय ३४) व महेश भगवान बुचडे (वय ३२) अशी जखमी दोघा चुलतभावांची नावे आहेत. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरील माहिती अशी की, वरणगे गावात भैरवनाथ व भगवान बुचडे हे दोघे सख्खे भाऊ राहतात. दोघांच्या नावे वडिलोपार्जित १५ गुंठे शेती व जुन्या घरांची ५ गुंठे सामाईक जमीन आहे. घरामागील जागेवरून दोघांतील वाद मिटवण्यासाठी ‘तंटामुक्ती’ने पुढाकार घेतला. बैठकीपूर्वीच भैरवनाथ त्या जागेत गोठा उभारत होते. शनिवारी सुतारकाम सुरू होते. त्यावेळी भगवान व चार बहिणींनी भैरवनाथला भेटून ‘तंटामुक्ती’च्या निर्णयानंतर बांध, असे समजावले. त्यावरून भावात वाद उफाळून झटापट झाली. भैरवनाथचा मुलगा विकास ऊर्फ नाना बुचडे यानेही चुलते भगवानवर चाकूहल्ला केला. भगवानचा मुलगा महेश व संदीप हेही दुचाकीवरून तेथे आले, त्यानीही भैरवनाथसह नानावर तलवार हल्ला केला. हल्ल्यात चाकू, गुप्ती, तलवार, कुऱ्हाड अशा हत्यारांचा वापर केला. चार बहिणींनीसह जावयानेही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. भगवानवर चाकूने सपासप वार झाले. घरासमोरच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले व गतप्राण झाले. हल्ल्यात महेश व विकास ऊर्फ नाना हे दोघेही गंभीर जखमी झाले.

परिसरात मोठा गोंधळ, आरडाओरडा झाल्याने गावकरी धावले. घटनेनंतर भैरवनाथ व नाना या पितापुत्राने सरकारी रुग्णालय गाठले. प्रभारी करवीर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

‘तंटामुक्ती’ बैठकीपूर्वीच वाद

वडिलोपार्जित सामाईक जमिनीवरून मृत भगवान व भैरवनाथ बुचडे या सख्ख्या भावांच्या कुटुंबांत वाद होता. वाद मिटवण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेऊन यापूर्वी दोन वेळा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघा भावांसह पाच बहिणींची एकत्र मंगळवारी बैठकीचे नियोजन केले होते. त्यासाठी बहिणी आल्या होत्या. तोपर्यंत वादावादी झालीच.

वार ‘आरपार’

हल्ल्यातील मृत भगवान यांच्या पाठीत धारदार चाकूने भोसकल्याने ती पोटातून बाहेर आली. त्यांच्या कमरेत, छातीवर, डाव्या हातावर खोलवर जखम झाल्या. त्यांचा मुलगा महेशच्या हातावर तर संशयित नाना बुचडे याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.

दोन्ही घरांतून आक्रोश..

दोन्ही कुटुंबांची परिस्थिती गरिबीची. मयत भगवान यांनी काही वर्षे पोस्टात नोकरी केली. सध्या ते मोलमजुरी करत होते. भैरवनाथ हे पोस्टात नोकरीस असून सेवानिवृत्तीसाठी अकरा महिने बाकी आहेत. दोघांंचीही दोन मुले खासगी नोकरी करतात. घटनेनंतर दोन्ही घरांत सुरू असणारा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

फोटो, ओळी स्वतंत्र फाईल देतो..

Web Title: (Revised) Murder of a cousin in Varanasi for a barn space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.