सुधारित : मुश्रीफ यांचा ३० कोटींची जागा बळकावण्याचा प्रयत्न; सुनील कदम यांचा आरोप : महापालिका विकत घेतल्यासारखा दोन्ही मंत्र्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:59+5:302021-03-14T04:22:59+5:30
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहाच्या डाव्या बाजूला असलेली ३० कोटी रुपये किमतीची अंदाजे ४५ हजार चौरस फुटांची आरक्षित जागा ग्रामविकास ...
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहाच्या डाव्या बाजूला असलेली ३० कोटी रुपये किमतीची अंदाजे ४५ हजार चौरस फुटांची आरक्षित जागा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुुनील कदम यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी महापौर सत्यजित कदमही उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचा कारभार महापालिका विकत घेतल्यासारखा असल्याची टीकाही त्यांनी शनिवारी केली.
कदम म्हणाले, महापालिका तसेच शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मुश्रीफ यांनी या जागेची मोजणी करून घेतली. आपल्याला पाहिजे तसा प्रस्ताव तयार करून घेतला. मात्र, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ‘ही जागा देता येणार नाही,’ असे ठामपणे सांगत हा जागा बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. उद्या मुश्रीफ या प्रकरणाशी आपला संबंध नाही म्हणतील; पण डॉ. बलकवडे यांनी जी भूमिका घेतली, त्यावरून आम्हाला डीवायपी मॉलच्या घरफाळ्याबाबतही त्या अशीच भूमिका घेतील, अशी आशा वाटते.
घरफाळा, थेट पाईपलाईन, ई-गव्हर्नन्स, कचरा उठाव खासगीकरण अशा अनेक प्रकरणांत मोठा भ्रष्टाचार झाला असून, महानगरपालिका विकत घेतल्यासारखा कारभार या दोन मंत्र्यांचा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. डीवायपी मॉलच्या घरफाळ्याबाबत आम्ही केलेल्या आरोपांना बगल देण्याकरिता सोलापूरमधील भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तसेच महाडिक उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा पालकमंत्री पाटील यांनी बगलबच्च्यांमार्फत उपस्थित करून मूळ विषयाला टाळत आहेत. भीमा कारखान्याबाबत केलेले आरोप मागे घेऊन त्याबाबत आठ दिवसांत माफी मागावी; अन्यथा पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशाराही कदम यांनी दिला. महाडिक उद्योगातील पाच हजार कर्मचाऱ्यांची यादी, फोन नंबर्ससह दिली आहे ती पाहावी, असेही कदम यांनी सांगितले. यावेळी विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना आव्हान...
डीवायपी माॅल तसेच ड्रीमवर्ल्ड वाॅटर पार्कच्या घरफाळ्यासंदर्भात आम्ही केलेल्या आरोपांना बगलबच्च्यांमार्फत उत्तरे न देता एका व्यासपीठावर समोरासमोर येऊन स्वत: पालकमंत्री सतेज पाटील यांनी आरोपांचे खंडन करावे. त्या ठिकाणी माजी खासदार धनंजय महाडिकसुद्धा उपस्थित राहतील, असे खुले आव्हान त्यांनी यावेळी दिले. आम्ही बी मॅट महाविद्यालयाचा कर भरला आहे, तुम्ही ‘डीवायपी’चा १५ कोटींचा घरफाळा कधी भरताय सांगा, अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
- दोनशे कोटींचा घरफाळा बुडाला
पालकमंत्री पाटील यांनी मॉल व ड्रीमवर्ल्डचा घरफाळा चोरल्यानंतर अनेक मोठ्या मिळकतधारकांनी तसेच अधिकाऱ्यांनी तशाच पद्धतीने घरफाळे कमी करून घेतले. त्यामुळे महापालिकेचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. घरफाळा बुडवायचा कसा, हे त्यांनी दाखवून दिले, असे सुनील कदम म्हणाले.