विधि अभ्यासक्रमाच्या तीनशे विद्यार्थ्यांचा लवकरच सुधारित निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:58+5:302021-05-27T04:26:58+5:30
सध्या शिवाजी विद्यापीठाकडून हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येत आहेत. ...
सध्या शिवाजी विद्यापीठाकडून हिवाळी सत्रातील परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या क्लस्टर पद्धतीने घेण्यात येत आहेत. यानुसार लेबर लॉ या विषयाचा पेपर ऑनलाईन स्वरूपात झाला. त्यासाठी बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपातील प्रश्न होते. प्रश्नपत्रिकेतील उत्तरतालिकेमधील तांत्रिक चुकीमुळे ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालामध्ये तीनशे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. योग्य पद्धतीने आणि पूर्ण पेपर सोडवूनदेखील कसे अनुत्तीर्ण झालो हे विद्यार्थ्यांना समजेना. या विद्यार्थ्यांनी त्याबाबत विद्यापीठाच्या तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार नोंदविली. त्यावर परीक्षा मंडळाने चौकशी केली असता, उत्तरतालिकेमध्ये तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले. या अभ्यासक्रमांच्या क्लस्टर पद्धतीने परीक्षा होत आहेत. त्यासाठी असलेल्या क्लस्टर यंत्रणेकडून संबंधित तांत्रिक चुकीची दुरूस्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे संगणक प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा मंडळाकडे गुण येतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया करून या विद्यार्थ्यांचा लवकरच सुधारित निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी दिली.