सावे व दुगुणवाडी पाणी योजनेस सुधारित मंजुरी पेयजल कार्यक्रम : दोन्ही योजनांना पावणेदोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:49+5:302021-04-10T04:24:49+5:30
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील नळ पाणी योजनेसाठी राज्य शासनाने एक कोटी २५ लाख रुपये तर गडहिंग्लज तालुक्यातील ...
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील नळ पाणी योजनेसाठी राज्य शासनाने एक कोटी २५ लाख रुपये तर गडहिंग्लज तालुक्यातील दुगुणवाडीच्या ४५ लाख ५३ हजार रुपयांच्या सुधारित योजनांना शुक्रवारी मंजुरी दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
सावे ग्रामपंचायतींने २७ नोव्हेंबर २०११ ला मूळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली होती. दुगुणवाडीची मूळ योजनेची मंजुरी १५ ऑगस्ट २०११ ची आहे. या दोन्ही योजनेच्या सुधारित आराखड्यास व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सादर केला होता. त्या आधारे शासनाने ही मंजुरी दिली. सुधारित किमतीत उर्वरित सर्व कामे तीन महिन्यांत पूर्ण करावीत, असेही बजावले आहे. योजना पूर्ण झाल्यावर महिन्यांच्या आत ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी. गावांतील शंभर टक्के नळ जोडणीची कार्यवाही करावी, असेही स्पष्ट केले आहे.
दोन्ही योजना २०११ ला मंजूर झाल्या आहेत. आता २०२१ साल उजाडले तरी अजून त्या पूर्ण झालेल्या नाहीत. योजना मंजूर होतात, परंतु त्यांना पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. निधी उपलब्ध झाला तर अनेकदा स्थानिक राजकारण अडवे येते. ते नसेल तर गैरव्यवहारातून काम रखडते त्यामुळे पाणी योजना लवकर पूर्ण होत नसल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे नदी गावाच्या उशाला असते तरी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.