सुधारित : तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:21+5:302021-01-02T04:20:21+5:30
तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध गुड न्यूजसाठी सुधारित : तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध * तरुणांचा पुढाकार : सुशिक्षित ...
तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध
गुड न्यूजसाठी सुधारित :
तेगिनहाळ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध
* तरुणांचा पुढाकार : सुशिक्षित महिला व नव्या तरुण चेहऱ्यांना संधी
राम मगदूम। गडहिंग्लज
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात कुठे ४२ लाखांची, तर कुठे सव्वादोन कोटीची बोली जाहीरपणे झाली. परंतु, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक बोलीशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ''''तेगिनहाळ''''ची निवडणूक तरुणांच्या पुढाकारामुळे पहिल्यांदाच बिनविरोध झाली.
तेगिनहाळ हे अवघ्या १२०० लोकवस्तीचे गाव. गावातील प्रमुख मंडळी विविध राजकीय पक्ष-गटात सक्रिय आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आजवरच्या सर्वच निवडणुका बहुरंगी आणि मोठ्या चुरशीने झाल्या. परंतु, यावेळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध करण्याचा निर्धार तरुणांनी केला, त्याला सर्वांनी साथ दिली. आठवड्यापूर्वी गावातील प्रमुख मंडळी व निवडणुकीसाठी इच्छुकांची महालक्ष्मी मंदिरात बैठक झाली. त्यावेळी, यापूर्वी ज्या कुटुंबांना ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यांना वगळून तरुण आणि सुशिक्षित नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय एकमताने झाला. त्यामुळे १७ इच्छुकांपैकी १० जणांनी गावाचा निर्णय मान्य करून उमेदवारी अर्जदेखील भरला नाही. ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल करण्यात आले, ते सर्व अर्ज छाननीत वैध ठरल्यामुळे केवळ निकालाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी आहे. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे.
याकामी राहुल नौकूडकर, संदीप निलवे, सिद्धांत पाटील, ओंकार नौकुडकर, संजय पाटील, आदिनाथ नौकुडकर, प्रतीक नौकुडकर, हेमंत पाटील, ओंकार घाटगे, अक्षय नौकुडकर व शिवानंद पाटील आदी तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांना माजी सरपंच तुकाराम चौगुले, सदाशिव कळविकट्टे, चंद्रकांत पाटील, अनिल जाधव, रवींद्र नौकुडकर, रवींद्र कांबळे आदी बुजूर्ग मंडळींनी मार्गदर्शन केले.
यांना मिळाली संधी...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याचा संकल्प सोडलेल्या विनोद नौकुडकर, मनोज जाधव, शेखर बाडकर, महानंद नौकुडकर, इंदुबाई कळविकट्टे, रेखा जाधव व रेखा चौगुले यांना बिनविरोध संधी देण्यात आली.
-------------------------
फोटो ओळी :
तेगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथे बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी विजयाची खूण दाखवली.