(सुधारित) : ‘संदीप’च्या स्वप्नावर फिरले अपघाताचे चाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:49+5:302020-12-08T04:22:49+5:30
गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी हे संदीप याचे मूळ गाव. पण, रोजगारानिमित्त गेल्या ३५ वर्षांपूर्वी वडील मारूती हे सुलगाव येथे आले. ...
गडहिंग्लज तालुक्यातील चिंचेवाडी हे संदीप याचे मूळ गाव. पण, रोजगारानिमित्त गेल्या ३५ वर्षांपूर्वी वडील मारूती हे सुलगाव येथे आले. त्याठिकाणी संदीप हा वाढला. तेथे शुभम त्याचा वर्गमित्र होता. शालेय शिक्षणानंतर शुभमने गोकुळ शिरगांव एमआयडीसीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो याठिकाणी आला. येथे चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्याला सुचली. त्याने संदीपला सांगितली. भागीदारीमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला अधिक चांगल्या पद्धतीने हातभार लावता येईल, असे स्वप्न त्यांनी एकत्रितपणे पाहिले. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी त्यांनी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गोकुळ शिरगांव एमआयडीसी परिसरात चायनीज सेंटरची सुरुवात केली. मात्र, या सेंटरवर नवीन कुक (आचारी) शोधण्यासह आणि साहित्य खरेदीसाठी रविवारी कोल्हापूर शहरात ते दुचाकीवरून आले. येथील लिशा हॉटेल चौकामध्ये घडलेल्या अपघातामध्ये संदीपचा मृत्यू झाला, तर शुभम हा गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे संदीपचे स्वप्न अधुरे राहिले. संदीप हा आई-वडिलांसमवेत सुलगाव येथे राहत होता. वर्षभरापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे वडिलांना संदीपचा आधार होता. या अपघातामुळे त्यांचा आधार तुटला आहे.
चौकट
हळहळ व्यक्त
मनमिळाऊ स्वभावाच्या आणि व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा, कुटुंबाला बळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप आणि शुभम या युवकांच्याबाबत घडलेल्या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो (०७१२२०२०-कोल-संदीप सुतार (अपघात)