सुधारित..भास्करराव पेरे-पाटील मुलाखत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:43+5:302020-12-27T04:18:43+5:30

काेल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. सत्ता ...

Revised..Bhaskarrao Pere-Patil Interview ... | सुधारित..भास्करराव पेरे-पाटील मुलाखत...

सुधारित..भास्करराव पेरे-पाटील मुलाखत...

googlenewsNext

काेल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळतो. मात्र सत्ता आल्यानंतर विकासकामांत ती ईर्ष्या दिसत नाही. ग्रामीण विकासासाठी स्थानिक नेत्यांसह सदस्यांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत पाटोदा (जि. औरंगाबाद)चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी साधलेला संवाद...

प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटाेळे करू नये : भास्करराव पेरे-पाटील

भावकी, जात, धर्माच्या आधारे निवडणुका होऊ नयेत : विकासाची दृष्टी, अभ्यासू असणाऱ्यांनाच मतदारांनी निवडून द्यावे.

प्रश्न : पाटोदा गावच्या विकासाचे सूत्र काय आहे?

उत्तर : पाटोदा आदर्श करण्यासाठी मी काही जादूची कांडी वापरली नाही. ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या खूप कमी अपेक्षा असतात. मूलभूत सुविधांची वेळेत पूर्तता केली की लोक समाधानी राहतात. त्याशिवाय खूप करण्यासारखे असते. तशी दृष्टी ठेवून आपण वाटचाल केली, तर महाराष्ट्रातील सर्वच गावे ‘पाटोदा’ होण्यास वेळ लागणार नाही.

प्रश्न ; अनेक गावे आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत?

उत्तर : ही वस्तुस्थिती आहे. अर्ध्या महाराष्ट्रात पाणी नाही. पाण्याबरोबर अनेक गावे रस्त्याविना चाचपडत पुढे जाताना पाहून खूप वेदना होतात. दोष देत बसण्यापेक्षा ग्रामपंचायतींनी सक्षमपणे विकासाचा आराखडा तयार करून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती पाहिजे. ती असेल, तर गावाला विकासापासून कोणी रोखू शकत नाही.

प्रश्न : कोट्यवधींचा निधी येतो, मग खेडी भकास कशी?

उत्तर : आईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांसाठी काम करते. सेवा-सुविधा पुरवीत असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अनेक योजना आहेत. मात्र यामधील किती आपल्याला माहीत आहेत? दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मग खेडी भकास होणार नाहीत तर काय होणार.

प्रश्न : नवीन येणाऱ्या सरपंच व सदस्यांना आपण काय सांगाल?

उत्तर : रस्ते, गटारी, पाणी यांबरोबर इतरही खूप काही करण्यासारखे आहे. शासकीय निधी योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जे वेळ देऊ शकतात, त्यांनीच ग्रामपंचायतीमध्ये यावे. प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटोळे करू नये.

प्रश्न : आपण पाटोळेचा कायापालट करण्यासाठी विकासनिधी कसा आणला?

उत्तर : ग्रामपंचायतीला खूप निधी येतो. पैशांची कमतरता अजिबात नसते. अलीकडे तर थेट ग्रामपंचायतींना निधी येतो. फक्त त्याचे नियोजन व्यवस्थित करून १०० टक्के खर्च करण्याची आपली मानसिकता हवी.

प्रश्न : निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही जनतेला काय आवाहन कराल?

उत्तर : ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थांनी विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका.

दडपशाहीने बिनविरोधपेक्षा निवडणूकच बरी

ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी. गावाच्या भल्यासाठी झटू पाहत असलेल्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन पेरे-पाटील यांनी केले.

Web Title: Revised..Bhaskarrao Pere-Patil Interview ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.