एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:33 PM2024-05-11T13:33:14+5:302024-05-11T13:33:45+5:30

गुणरत्न सदावर्ते आणि त्याची पत्नी जयश्री यांचे संचालकपद सहकार खात्याने रद्द केले

Revoking the illegally approved bye-laws will once again transform ST Bank | एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप

एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याची आशा; बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीला चाप

सचिन यादव 

कोल्हापूर : एसटी बँकेवरील तज्ज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि त्याची पत्नी जयश्री यांचे संचालकपद सहकार खात्याने रद्द केले आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द केल्याने पुन्हा एकदा एसटी बँक विकासाचा टॉप गिअर टाकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ठेवी काढून घेणे, बेकायदेशीर नोकर भरती, तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुका थांबणार आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना बंद केलेले कर्जवाटप पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

द स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेवर (एसटी) सदावर्ते पॅनेलची सत्ता आहे. त्यामध्ये सदावर्तेच्या १० आणि शिंदे गटाच्या ९ संचालक आहेत. सहकार खात्याने दिलेल्या निर्णयामुळे सदावर्ते दांपत्याला तज्ज्ञ संचालकपदावरून मुक्त केले आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या १० संचालकांवर एसटी सभासदांच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवणुकीचा दबाव वाढणार आहे. शिंदे गट विरोधात सदावर्ते गट असे एसटी बँकेच्या राजकारणात चित्र असले तरी सर्वसामान्य एसटी बँकेच्या सभासदाला कर्ज आणि सुरक्षित ठेवींची चिंता आहे.

४६६ कोटींच्या ठेवी काढल्या

सदावर्ते पॅनेलचे संचालक मंडळ आल्यापासून बँकेतून ४६६ कोटींच्या ठेवी काढल्या. त्यामुळे बँकेचा आर्थिक डोलारा कोलमडला. बँकेचा सीडी रेशोही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गेला. सीडी रेशो वाढल्याने सध्या बँकेतून कर्जवाटप बंद आहे. त्यामध्ये आणखी वाढ झाल्यास बचत खात्यातील पैसे काढण्यावरही मर्यादा येतील. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या सुमारे साडेतीन हजार सभासदांच्या पैशाचा प्रश्नही गंभीर आहे.

वार्षिक सभेचे पडसाद

सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे बँकेची वार्षिक सभा घेतली. सभेपूर्वी सभासदांना अहवालाचे वाटप केले नव्हते. वार्षिक सभा घेण्यापूर्वी सभासदांना १४ दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणे आवश्यक होते. अशा कुठल्याही सूचना संचालक मंडळाने दिल्या नसल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला होता. त्यातूनच ‘आरबीआय’ आणि सहकार खात्याकडे तक्रारी झाल्या.

आरोप

  • बँकेचे व्यवस्थापन सक्षम नाही
  • चुकीचे अधिकारी नेमले
  • ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ
  • बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांतून असण्याचा ठराव
  • एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्वाचा ठराव
  • ठेवीच्या व्याजापेक्षा कमी दराने कर्ज


अनेक आरोप

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सदावर्ते यांचे नातेवाईक असल्याचा आरोप झाला. सदावर्ते यांच्या २३ वर्षीय मेहुण्यालाही पद दिल्याचा आरोप झाला. गरज नसताना नोकरभरतीचा घाट रचला. त्यामुळे एसटी बँक अडचणीत आल्याचा आरोप सभासदांनी केला.

एसटी बँक

  • ६२ हजार सभासद
  • ५० शाखा
  • १८४५ कोटींच्या ठेवी
  • सीडी रेशो ९० टक्क्यांहून अधिक

सहकार खात्याकडे एकूण १३ विषयांची तक्रार केली होती. त्यामध्ये बेकायदेशीर कर्मचारी भरतीला स्थगितीसह वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले ठरावही स्थगित केले. त्यामुळे किमान एसटी बँक विकासाच्या दिशेने नव्याने वाटचाल करेल. - संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना

Web Title: Revoking the illegally approved bye-laws will once again transform ST Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.