महाडिक विरोधी बंडाची ‘बक्षिसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:20+5:302021-05-15T04:23:20+5:30
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात केलेले बंड, विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी ‘दक्षिण’मध्ये बांधलेली मोट ...
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात केलेले बंड, विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी ‘दक्षिण’मध्ये बांधलेली मोट आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, या सगळ्यांमुळेच विश्वास पाटील यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचे बक्षीस मिळाले. ज्येष्ठत्वाचा मुद्दाही येथे महत्त्वपूर्ण ठरला असला तरी निवडणुकीतील यशस्वी क्लृप्त्यांसह एकूणच राबणूक फळाला आली, असेच म्हणावे लागेल.
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली होती. ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन करायचे झाल्यास सत्तारूढ गटाला खिंडार पाडून दोन-तीन वजनदार संचालकांना सोबत घ्यावे लागणार हे त्यांना माहिती होते. त्यानुसार सत्तारूढ गटातील धुसफुसीचा फायदा उचलत त्यांनी विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर या तिघांना सोबत घेतले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांची मोट बांधली आणि सत्तांतर घडवले. सत्तांतरानंतर विश्वास पाटील व अरुण डोंगळे हे अध्यक्षपदाचे दावेदार होते. यामध्ये पाटील यांनी बाजी मारली. यामागे अनेक कंगाेरे आहेत. सत्तारूढ गटात असताना महादेवराव महाडिक व त्यांच्यात झालेला संघर्ष, त्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी ‘करवीर’मध्ये आमदार पी. एन. पाटील, तर ‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली होती. त्यानंतर ‘गोकुळ’च्या पॅनल बांधणीसह ठरावाच्या गोळा बेरीजमध्ये त्यांनी आपला अनुभव पणास लावला. जिल्ह्यातील कोणता ठरावधारक कोणासोबत राहील, आपल्याकडे वळण्यासाठी काय करावे लागेल, यासह ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील सगळ्या क्लृप्त्या त्यांना माहिती असल्याने त्यानुसार पत्ते टाकत गेले आणि त्यात यश मिळाले. मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत पाटील यांची यंत्रणा अधिक सक्रिय होती. यासह अध्यक्षपदावरून अपमानकारक पायउतार व्हावे लागले होते. या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष पदासाठी विश्वास पाटील यांचे पारडे जड राहिले.
सत्तारूढ गटाला सोडचिठ्ठी देताना सत्तांतरानंतर आपणास अध्यक्ष पदाची पहिली संधी मिळावी, असे अरुण डोंगळे यांनी नेत्यांना सांगितले होते. त्यामुळे डोंगळे यांना पहिल्यांदा संधी द्यावी यासाठी मंत्री हसन मुश्रीफ हे आग्रही होते. मात्र, मंत्री सतेज पाटील यांनी विश्वास पाटील यांना आता संधी देणे कसे गरजेचे आहे, हे पटवून दिल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी होकार दिल्याने पाटील यांचा मार्ग सुकर झाला.
डोंगळेंचा मुत्सद्दीपणा
‘गोकुळ’च्या सत्तासंघर्षात मंत्री मुश्रीफ जिकडे जाणार तिकडेच सत्ता राहणार अशीच काहीशी परिस्थिती सुरुवातीपासून होती. ते आपल्यासोबत राहावेत, यासाठी सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून प्रयत्न होते. हे ओळखूनच अरुण डोंगळे यांनी मुत्सद्दीगिरी दाखवत सत्तारूढ गटातून बाहेर पडल्यानंतर थेट मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात ते यशस्वी झाले.
शेवटच्या वर्षासाठी चौगले, मुश्रीफ दावेदार
विश्वास पाटील व डोंगळे यांना दोन-दोन वर्षाचा कालावधी मिळणार आहे. उर्वरित एका वर्षासाठी बाबासाहेब चौगले यांच्यासाठी मंत्री सतेज पाटील आग्रही राहू शकतात. मात्र, नविद मुश्रीफ यांचेही नाव पुढे येऊ शकते.
‘करवीर’मधील राजकीय संदर्भ बदलणार
‘गोकुळ’सह ‘करवीर’च्या राजकारणात विश्वास पाटील यापुढे मंत्री सतेज पाटील यांच्यासोबतच राहणार हे निश्चित आहे. विश्वास पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात असल्याने येथील राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे.