रंकाळ्यावर जल्लोषाचा ताल...लहानांबरोबर मोठ्यांचीही धमाल !
By admin | Published: April 19, 2015 11:53 PM2015-04-19T23:53:38+5:302015-04-20T00:26:09+5:30
लोकमत ‘धमाल गल्ली’ कार्यक्रम; सायकलिंग, बॅडमिंटन, कथ्थक नृत्य, झुंबा डान्स, विटी-दांडू, दोरीवरच्या उड्या, आदी खेळांची रेलचेल
कोल्हापूर : लहानांसह पालकांनीही बालपणीच्या आठवणींना जणू त्या काळातच जावून उजाळा दिला. निमित्त होतं, रंकाळा जुना पदपथ येथे ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘धमाल गल्ली’चे. शाळकरी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनाही रविवारची सकाळ पर्वणीच ठरली. या कार्यक्रमात उपस्थितांनी मनसोक्त मौजमजा लुटली. रंकाळा जुना पदपथ उद्यानात मन मानेल अशी मस्ती करण्यास मुभा मिळाल्याने मुलांच्या आनंदाला उधाण आले होते. कधी नव्हे, तो पालकवर्गही या धमाल मस्तीत अगदी लहान मुलांप्रमाणेच सहभागी झाला होता. या गल्लीत अगदी पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह विटी-दांडू, सायकलिंग, झुंबा डान्स, कथ्थक नृत्य, रस्सीखेच, दोरी उड्या, काचेच्या गोट्यांचा खेळ, जिबली अर्थात लंगडी घालण्याचा खेळ, माऊथ आॅरगन, हास्य, योगासने, व्हायोलियन वादन, तबलावादन, सोलो परफॉर्मन्स, गिटारवादन, पथनाट्य, टॅटू काढणे, रांगोळी अशा एक ना अनेक गमती-जमती व विस्मृतीत गेलेल्या अनेक खेळांचा स्वर्गीय आनंद उपस्थितांनी लुटला. या ‘धमाल गल्ली’ची सुरुवात वेदा सोनुले यांच्या व्यंकटेश स्तोत्राने झाली. नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील हिने ‘गणेशवंदना’ सादर केली. सार्थक क्रिएशनने छत्रपती शिवरायांवर आधारित ‘हे राजे’ हे नृत्य सादर करत उपस्थितांची वाहव्वा मिळवली.
तत्पूर्वी, लोकमत ‘धमाल गल्ली’ या कार्यक्रमाचे शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, इव्हेंट व्यवस्थापक दीपक मनाठकर आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर या कार्यक्रमाची सांगता वर्षा गुळवणी यांच्या पसायदानाने झाली. अक्षय डांगरे व विक्रम रेपे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
आणखी छायाचित्रे व वृत्त पान ८ वर