चंदगडमध्ये भात,नाचणी पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:20+5:302021-07-27T04:24:20+5:30
गेल्या आठवड्यात म्हाताऱ्या पावसाने चंदगड तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, चंदगड तालुक्यात ...
गेल्या आठवड्यात म्हाताऱ्या पावसाने चंदगड तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले होते. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, चंदगड तालुक्यात नदी, नाल्यांमधूनही पाणी बाहेर पडले. बाहेर पडलेले पाणी वाट मिळेल त्या दिशेने गेल्यामुळे नुकताच केलेल्या भात रोप लागवडीसह ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतीच गायब झाली आहे. तर ओढ्याचा प्रवाहच बदलून शेतामधून नवीन ओढा तयार झाला आहे.
चंदगड तालुक्यातील शेतकरी हा ऊस, भात, नाचणी व रताळी या मुख्य पिकांवर अवलंबून आहे. शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल, यासाठी लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनीही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकर कसे होऊन शेतकऱ्यांच्या पदरात मदत कशी पडेल, यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
विम्याबाबत जागृती नसल्याने अडचण
गेल्या काही वर्षापासून पावसाचा अनियमितपणा तर कधी पावसाभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. हे ओळखून काही जागरूक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याचा लाभ फक्त काहीच शेतकऱ्यांना होताे. यामुळे पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होणे गरजेचे आहे.
फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील महापुरामुळे अनेक ठिकाणची शेती वाहून गेली असून त्याठिकाणी नदी व नाल्यांमधील दगड-गोट्यांचा खच पडला आहे.
क्रमांक : २६०७२०२१-गड-०१