समृद्ध अनुभव

By admin | Published: January 30, 2017 12:58 AM2017-01-30T00:58:03+5:302017-01-30T00:58:03+5:30

समृद्ध अनुभव

Rich experience | समृद्ध अनुभव

समृद्ध अनुभव

Next


परवा माझ्या मैत्रिणीचा अंजूचा फोन आला. तिचा मुलगा आदित्य सध्या पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतोय. लहानपणापासून आदित्यला सायकल चालवायला खूप आवडायचं; पण अंजूच्या अतिकाळजी करण्याच्या स्वभावामुळं त्याला ती सायकलवरून कुठंच जाऊ द्यायची नाही. सध्या तो पुण्यात पुन्हा सायकल चालवायला लागलाय आणि या सुटीत घरी येण्याऐवजी ‘बीआरएम २००’ या सायकल रपेटीत सहभागी होणार आहे. अंजूला हे अजिबात पसंत नाही. त्याला काही झालं तर? ही एकच चिंता तिला सतावते आहे.
सध्याच्या टू व्हिलर आणि फोर व्हिलरच्या जमान्यात सायकलवरून फिरणारा माणूस दिसणं दुर्मीळच झालंय. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण तसंच रहदारीच्या समस्याही वाढलेल्या दिसतात; पण या समस्यांचं गांभीर्य जाणवू लागल्यानं शहरात अनेकजण सुटीच्या दिवशी किंवा रोज सकाळी सायकलवरून फिरणं पसंत करू लागलेत. अशाच सायकलप्रेमींमध्ये ‘बीआरएम’ हा प्रकार लोकप्रिय होत आहे.
युरोपमधील फ्रान्स, इटली, हॉलंड अशा देशांत गेलं की, आजही सायकल चालविणारे अनेकजण भेटतात. फ्रान्समधील ‘अ‍ॅण्डॉक्स क्लब पॅरिसिअन’ ही संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देते. तसंच ‘बीआरएम’चं आयोजन करते. १८९१ साली पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस अशा १२०० किलोमीटरच्या सायकल इव्हेंटपासून याची सुरुवात झाली. यामध्ये २००, ४००, ६०० किलोमीटर असे वेगवेगळ्या अंतराचे टप्पे आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लांब पल्ल्याच्या सायकलिंगला स्पर्धेचं स्वरूप नाही. सायकलिंग करताना आपल्याबरोबर असणाऱ्या ओळखीच्या किंवा अनोळखी मित्राला सोबत करणं, मदत करणं, एकमेकांशी स्पर्धा न करता सहभागी झालेल्या इतर मित्रांना आपल्यासोबत घेऊन जाणं हा बीआरएमचा मुख्य उद्देश आहे. या रपेटी दरम्यान एखाद्याला अपघात झाला, सायकलचा टायर पंक्चर झाला, तर त्याला मदत करायची, तसंच भूक लागली, चहा-नाश्त्यासाठी कोणी थांबलं तर पुढं निघून न जाता त्याच्यासोबत आपणही खाण्याची मजा लुटायची आणि नंतर आपापल्या वेगानुसार रपेट पूर्ण करायची. साधारण ताशी १५ किलोमीटर वेगानं सायकल चालवायची. यासाठी कुठल्याही पात्रतेची गरज नसून, १८ वर्षांवरील कोणालाही यात सहभागी होता येतं.
‘बीआरएम’विषयी हे सगळं ऐकल्यावर मला २५ वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. त्यावेळी सायकल असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. हायस्कूलमध्ये गेलं की पालक मुलांना सायकल घेऊन द्यायचे आणि शाळा, क्लास, छोटी-मोठी कामं अशा ठिकाणी स्वतंत्रपणे सायकलवरून जाण्याची परवानगीही. आम्ही काही मैत्रिणी सायकलवरून रोज शाळेत जात असू. वाटेत गप्पा मारत, फारशी रहदारी नसेल तेव्हा एक हात सायकलच्या हँडलवर आणि दुसरा मैत्रिणीच्या हातात अशी जोडीनं सायकल चालवत जायला मजा यायची. शिवाय थ्रिलही वाटायचं. सुट्टी लागली की, रोज सकाळी लवकर उठून सायकलवर टांग मारायची आणि कधी गावाबाहेर टेकडीवर सूर्योदय पाहायला जायचं, तर कधी एखाद्या ग्राऊंडवर जाऊन वेगवेगळे खेळ खेळायचे. मनसोक्त हुंदडल्यावर घामाघूम होऊन घरी परत यायचं, हा आमचा ठरलेला कार्यक्रम. त्यावेळी कधी कधी आमच्यापैकी एखादीची सायकल पंक्चर व्हायची, कधी कुणी सायकलवरून तोल जाऊन धडपडायची, कधी खूप फिरल्यावर भूकही लागायची. अशावेळी आम्ही मैत्रिणीही एकमेकींच्या सोबतीनंच सगळ्या गोष्टी करत होतो. त्या सायकलिंगचा उपयोग शरीर सुदृढ राहण्यासाठी किती झाला माहीत नाही, पण त्या स्वच्छंदपणामुळं मनाचं आरोग्य चांगलं व्हायला मदत झाली. म्हणजे आम्ही अशा कुठल्याच ‘बीआरएम’च्या सदस्य नव्हतो, तरी हातात हात घालून फिरताना आपल्यासोबत इतरांना घेऊन जाण्याचा संस्कारही नकळत झाला. ‘बीआरएम’ हा आदित्यसाठी असाच एक अनुभव असेल, पण माझ्या मैत्रिणीला, अंजूला हे कळेल का?
उज्ज्वला करमळकर

Web Title: Rich experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.