‘श्रीमंत’ कोल्हापूरच्या पोकळ बाताच!

By admin | Published: October 29, 2015 12:45 AM2015-10-29T00:45:49+5:302015-10-29T00:46:54+5:30

उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा : तुमचीच तिजोरी रिकामी, मग देणार काय? ; मतं मागताना फसवू नका

'Rich' hollow from Kolhapur! | ‘श्रीमंत’ कोल्हापूरच्या पोकळ बाताच!

‘श्रीमंत’ कोल्हापूरच्या पोकळ बाताच!

Next

कोल्हापूर : ‘महापालिकेची सत्ता द्या, तिजोरी भरून देऊ, असं मुख्यमंत्री म्हणतात; पण ज्यांची तिजोरीच रिकामी आहे, ते कोल्हापूरला काय देणार? असा सवाल करत, निदान मतं मागायला येताना तरी जनतेला फसवू नका,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री येथील जाहीर सभेत भाजपला टोला लगावला. शिवसेनेबरोबरची पंचवीस वर्षांची युती तोडणाऱ्या भाजपबरोबर केवळ जनतेच्या हितासाठी राज्यात सत्तेत सहभागी आहे, सत्तेसाठी आम्ही लाचारीमुळे नाही, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील पेटाळा मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेत ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले शिवाय राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्याचा पंचनामाही केला. सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला.
शिवसेना हा दिलेला ‘शब्द’ पाळणारा पक्ष आहे म्हणून मी जे बोलेन ते करीन आणि जर का दिलेला ‘शब्द’ पाळला नाही तर पुन्हा कोल्हापूरला येणार नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळीही आम्ही काही वचने दिली; परंतु राज्यात शिवसेनेची पूर्ण सत्ता आली नाही. याबद्दल जळफळाट जरी नसला तरी चांगली कामे कशी होतील यादृष्टीने प्रयत्न करत आहोत. आम्ही सत्तेशी बांधील नाही तर जनतेशी बांधील आहोत म्हणूनच पुन्हा कोल्हापूरला येईन तर तो शिवसेनेचा महापौर घेऊनच येईल, असे ठाकरे म्हणाले.
भाजपवर आज खरंतर बोलावे की नको, बोलायचं नाही असं ठरविले की अंगावर येते आणि अंगावर आले की मग पंजा मारावाच लागतो, शेवटी ही शिवसेना ही वाघाची औलाद आहे. शिवसेनेबरोबरची युती कोणी तोडली, याचा खुलासा एकनाथ खडसेंनी केला आहे. हिंदुत्वासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेली युती कोणी तोडली, कोणत्या कारणांसाठी तोडली, हे आता जनतेला कळाले आहे. आमचा गुन्हा तो काय होता? पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणातील अस्पृश्य असणाऱ्या भाजपला बाळासाहेबांनी स्वीकारले. कोणी जवळ करायला तयार नव्हते. चांगले दिवस येतील असे वाटले होते; पण पंचवीस वर्षांनंतर तुम्हाला हिंदुत्व नको झाले. शिवसेना नको झाली आणि तिकडे काश्मिरात पाकचे झेंडे भारतीय भूमीवर फडकाविणारे मुक्ती महंमद सईद तुम्हाला चालतात. त्याची तुम्हाला लाज वाटत नाही. आम्ही जनेच्या हितासाठी सत्तेत आहे. भीकेसाठी वाडगा घेऊन आलेलो नाही. तुम्हाला शिवसेना नको ना मग काय व्हायचं ते एकदा होऊ द्या, अशा आव्हानात्मक भाषेत ठाकरे यांनी भाजपचा पाणउतारा केला.
ज्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कोल्हापूरकरांवर टोल लादला, अशांना सोबत स्थापन झालेल्या ताराराणी आघाडीच्या मांडीला मांडी लावून भाजप निवडणूक लढवत आहे. मांजर डोळे मिटून दूध पित असले तरी जगाचे त्याच्याकडे लक्ष असते. टोलचे समर्थन करणाऱ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आणि व टोल रद्द करू म्हणायचे हे फसवायचे बंद करा, असेही ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत ज्यांनी कोल्हापूरला सडवले त्या काँग्रेस, राष्ट्रवादीची मटकी डोक्यावर घ्यायची का हे ठरवा, मटकेवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी स्वीकारायचे का ते पहा, असे आवाहनही त्यांनी केले. संकटांच्या छाताडावर चालून जाण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसैनिक या निवडणुकीत एकटा लढतोय ही संधी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना घरी घालवा, असेही ठाकरे म्हणाले.

महाडिक हे पत्त्याच्या खेळातील जोकर
‘मटके’वाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक यांची छत्रपती ताराराणीचे नाव घेण्याची लायकी तरी आहे का..? ज्या रणरागिणीने औरंगजेबालाही अखेरपर्यंत झुंजविले, तिचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही तर पत्त्याच्या खेळातील जोकर आहात, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे झालेल्या प्रचारसभेत केली. ठाकरे म्हणाले, ‘जुगाराच्या डावात जसा जोकर सगळीकडे चालतो तसे तुमचे राजकारण आहे. आपण एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात आणखी कोण तिसऱ्या पक्षात. कुणीही निवडून आले तरी गल्ला आमचाच भरणार. कोल्हापूरची जनता अशांना निवडून तरी कशी देते..?



पालकमंत्री म्हणजे ‘लबाड लांडगं’ : क्षीरसागर
कोल्हापूर : गेली पंचवीस वर्षे शिवसेनेचे भरपूर सहन केले म्हणणारे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणजे ‘लबाड लांडगं ढॉँग करतंय’ अशी जहरी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी रात्री येथे केली. एका बाजूला पालकमंत्री एकमेकांवर टीका करू नये असे आवाहन करतात आणि दुसऱ्या बाजूला एक ‘खुळं’ माझ्यावर टीका करीत आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपचे महेश जाधव यांच्यावर नाव न घेता केली.
मटकेवाल्यांना ठोकून काढा म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन व विचार करून बोलावे; कारण भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार हे मटकेवाले, दारूवाले आहेत. तसेच टोल आणणाऱ्यांना हद्दपार करा, अशी वल्गना करणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप-ताराराणी आघाडीने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यातील काहीजण हे २००५ च्या सभागृहात नगरसेवक असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पालकमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. पालकमंत्री ज्या भागात राहतात त्या प्रभागाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे; परंतु शहरात मात्र लोकांना प्रातर्विधीसाठी उघड्यावर बसावे लागते, हे दुर्दैव आहे. पालकमंत्री एकीकडे वाद थांबवा म्हणतात आणि दुसरीकडे काहीतरी बरळतात. यावरून त्यांना शिवसेनेच्या वैचारिक मतभेदांचा ‘अटॅक’ आल्याचे दिसते, अशी टीका गोऱ्हे यांनी केली.
डॉ. शिवरत्न शेटे यांनी शिवसेना हा अठरापगड जातींचा पक्ष असल्याचे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या जातीच्या लोकांना आमदार केल्याचे सांगितले.
जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी कुणाशी हातमिळवणी केलेली नाही. त्यामुळे सर्वच प्रभागांत उमेदवार पक्षाने उमेदवार उभे केले असून ती धमक फक्त शिवसेनेतच आहे. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर यांनीही आपल्या भाजपसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.



...यांनाही ठोकून काढा
मटकेवाल्यांना ठोकून काढा, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या राजलक्ष्मी नगरातील महिला उमेदवारांचे मटकेवाले पती दत्ता बामणे यांना ठोकून काढावे, असा टोला आमदार क्षीरसागर यांनी यावेळी हाणला.

Web Title: 'Rich' hollow from Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.