शिक्षक-पालक समन्वयातून समृद्ध शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:11 AM2019-07-10T00:11:05+5:302019-07-10T00:11:10+5:30

भारत पाटील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी हाती घेतलेला ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ प्रभावीपणे मला ...

Rich schools with teacher-parent coordination | शिक्षक-पालक समन्वयातून समृद्ध शाळा

शिक्षक-पालक समन्वयातून समृद्ध शाळा

Next

भारत पाटील
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागात शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी हाती घेतलेला ‘राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम’ प्रभावीपणे मला राबवायचा होता. यासाठी मी पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सविस्तर चर्चा व्हावी यासाठी मुद्दामच विषय घेतला होता. आमच्या सभागृहात गणपती कांबळे (गुरुजी), डी. जी. सर (कोतोली) हे निवृत्त शिक्षक होते. अ‍ॅड. महादेवराव चावरे (देवाळे) हे सीनिअर वकील व बी. आर. पाटील हे अभ्यासू सदस्य होते. सर्वांना हा उपक्रम अतिशय आवडला होता. कार्यक्रम नियोजनासाठी आम्ही एक सभा बोलावली होती. गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी प्रास्ताविकातून सविस्तर कार्यक्रम सांगितला व चर्चेला सुरुवात झाली. त्यात सर्वांनी समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केली आणि हे अगदीच सत्य होतं. कारण त्यावेळी १४४ शिक्षक पदे रिक्त होती. विशेषत: पश्चिम पन्हाळामध्ये धामणी खोरा व कासारी खोऱ्यामधील शाळेत ही पदे रिक्त होती. पदवीधर तर काही शाळांतच कार्यरत होते. इमारतींची फारच दुरवस्था होती. पावसाचे प्रमाण जास्तच असल्यामुळे शाळेच्या इमारतींमध्ये गळतीचे प्रमाण जास्त होते. दुरुस्ती, कंपौंड व रिक्त पदे याविषयी सर्वजण बोलत होते. माझ्या अध्यक्षीय भाषणात मात्र हे एक अभियान आहे, आपणाला परिवर्तन करायचे आहे. भौतिक सुविधा या जरी अपुºया असल्या तरीही शालेय गुणवत्ता ही आपल्या वाड्यावस्तीवरील मुलांचे पूर्ण आयुष्य बदलू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी हा उपक्रम राबवायचा आहे. तुम्ही ज्या समस्या मांडल्या, त्यांची आपण सर्वांनी एका वर्षात पूर्तता करण्याचा निर्धार पण करूयात. जरी समस्या असल्या, तरी आपली मुलं शाळेत शिकतात, त्यांचं नुकसान करायचे नाही. यासाठी शासन, लोकसहभाग, सरपंच, सर्व शिक्षक व पालक संघ यांच्या सहयोगातून आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची गुणवत्ता सुधारूया, ही नम्र विनंती सर्वांना केली.
त्यानंतर मी तालुक्यातील सर्व १७८ शाळांना गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी आर. आर. पाटील व डावरी यांच्यासोबत भेटी दिल्या. यामध्ये सरपंच, सदस्य, शिक्षक व पालकांशी संवाद साधला व हा उपक्रम कसा राबवूया? शाळा हे मंदिर आहे, शाळा ही आपल्या मुलांचे आयुष्य घडवू शकते हे सांगत होतो. मी स्वत: कन्या विद्यामंदिर कोडोली ही शाळा दत्तक घेतली होती. शाळेचे मुख्याध्यापक सज्जन जाधव, बुचडे, बबन केकरे, प्रताप राबाडे, सुनंदा पाटील, सुनीता पाटील, जानकी कोरडे, चव्हाण, नूतन पाटील व घाडगे हे शिक्षक कार्यरत होते. या सर्वांच्या कामाबद्दल मला आजही अभिमान वाटतो. आम्ही सर्वांनी या शाळेत प्रत्येक मुद्द्यावर सूक्ष्मरीत्या काम केलं होतं. कारण शाहू सर्वांगीण कार्यक्रमांत जिल्हा परिषद मूल्यमापन करून नंबर काढणार होती. त्यामुळे सर्व शिक्षक अगदीच सतर्कपणे काम करत होते. यात विशेषत: प्रयोगशाळा व ग्रंथालय खूपच दर्जेदार झाले होते. मुलींमध्ये एक आत्मविश्वास वाढला होता. आमच्या मुली कोणत्याही कार्यक्रमात अगदी सराईतपणे अँकरिंग करत होत्या. या सर्वांचे मूल्यमापन होणार होते. प्रत्येक मुद्द्यांवर अभ्यास करून तयारी केली होती. कारण जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती येणार होती. कन्याशाळेच्या सर्व शिक्षकांनी अतिशय परिश्रम घेतले होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर यांच्यासोबत महावीर माने व इतर पाच सदस्य शाळा तपासणीसाठी आले होते. यावेळी सर्व गाव स्वच्छ केले होते. सरपंच यशोदा पाटील (नानी) व सदस्यही हजर होते. खरंच, एखादं कार्य सगळ्या गावाने मनावर घेतलं तर कसं परिवर्तन होतं ही ‘शिक’ मला मिळाली होती. समितीचे भव्य स्वागत झाले नंतर त्यांनी कसून तपासणी केली होती. जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील सर्व शाळांचे मूल्यमापन पूर्ण झाल्यावर अध्यक्ष आण्णासाहेब नवणे व प्रभाकर देशमुख, अजय सावरीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला होता. यावेळी कन्याशाळा कोडोलीचा प्रथम क्रमांक आला होता व शाळेला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. देवाळे विद्यामंदिर (ता. करवीर) चा द्वितीय क्रमांक असा निकाल जाहीर झाला होता. आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले होते. आमच्या शिक्षक व मुलींच्या तोंडावरील विजयी हास्य हे अजूनही अविस्मरणीय आहे. ही विजयी परंपरा आम्ही प्रतिवर्षी ठेवली होती. पुढे गणपती कांबळे यांची पणुत्रे येथील चौथीपर्यंतची शाळा व पुनाळ विद्यामंदिर या शाळांचेही नंबर जिल्ह्यात आले. मिठारवाडी, बाद्रेवाडी, जाखले विद्यामंदिर अशा अनेक शाळांमध्ये खूपच सुंदर काम झाले होते. पुढे आम्ही सर्वांनी ‘समृद्ध शाळा’ अभियान हाती घेतलं होतं. त्यातूनच पुढे माजी विद्यार्थी मेळावा, ई-लर्निंग सुविधा याबाबत सगळे आग्रही राहिलो होतो. अजूनही भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील मुलं स्कॉलरशिप व नवोदय विद्यालय या परीक्षेत जसं घवघवीत यश मिळवतात, तसं पन्हाळा तालुक्यात कार्य होण्याची खूपच गरज आहे. आपली शाळा दर्जेदार करण्यासाठी सर्वांनी आता पुढे आलं पाहिजे.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Rich schools with teacher-parent coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.