कोल्हापूरची समृद्ध वन्यजीवसृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:15 AM2018-07-05T00:15:54+5:302018-07-05T00:16:32+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गव्यांसोबतच ग्रेट हॉर्नबिल, करवंदे, भेरली माड म्हणजेच पालम ट्री, सोनघंटा हे फूल, ग्रेट आॅरगन ट्रिप हे फुलपाखरू, स्वच्छ पर्यावरणाचे निर्देशक असलेले देवगांडूळ आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये डारविनी सरडा यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रजातींचे संवर्धन, संशोधन, प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल कोल्हापूरमध्ये उचलण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, चंदगड, पाटगाव, आंबा, गगनबावडा या भागांत मोठं जंगल आहे. त्यामध्ये १६० फुलांच्या जाती, २२५ पक्ष्यांच्या जाती, २२२७ सपुष्पांच्या जाती असल्याची माहिती वनविभागाच्या अभ्यासात समोर आली आहे. या प्रजातींच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील एक हजार ग्रामपंचायतींमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यानुसार आता पर्यावरणाच्या दृष्टीने अभ्यासही सुरू झाला आहे. सध्याच्या युगात मानवजातीच्या हस्तक्षेपामुळं वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे; पण कोल्हापूरमध्ये आता नष्ट होणाºया प्रजातींना मानचिन्ह प्रदान करून याच पर्यावरणाच्या संवर्धनाचा प्रयत्न केला जात आहे.
कोल्हापूर वन परिक्षेत्रात दोन अभयारण्ये
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, एकूण भौगोलिक क्षेत्र ७६८५ चौरस किलोमीटर आहे. त्यात सद्य:स्थितीत १०८८ चौरस किलोमीटर क्षेत्र घनदाट अरण्य म्हणून, तर खुले वन म्हणून ७०८.८९ चौरस किलोमीटर असे एकूण १७९६ चौरस किलोमीटर इतके वन आहे. या परिक्षेत्रात चांदोली व दाजीपूर अशी दोन अभयारण्ये आहेत. एकूणच हा वन भाग ‘सह्याद्रीचा घाट’ म्हणून ओळखला जातो.
या वनक्षेत्राचे वैशिष्ट्य
पृष्ठवंशीय अर्थात पाठीचा कणा असलेल्या १६२ प्रजाती, ६८ सर्वसाधारण, २३०० कीटक, टोळवर्गीय आहेत; तर ‘युनेस्को’ने जागतिक जैवविविधता आढळस्थान म्हणून पश्चिम घाटासह या वनक्षेत्राचाही जागतिक वारसा जैवविविधतेत समाविष्ट केला आहे. हॉर्नबिल पक्ष्याच्या संवर्धनासाठी चार प्रजातींचे संवर्धन केले आहे. जगातील सर्व प्रजातींमधील ६० टक्के प्रजाती या वनक्षेत्रात आढळतात.
सस्तन प्राणी : १४० प्रजाती, पक्ष्यांच्या ५१० प्रजाती, सरपटणारे प्राण्यांच्या २६० प्रजाती, तर पाण्यात व जमिनीवर अस्तित्व ठेवणाºया १८० प्रजाती या परिसरात आढळतात. शुद्ध पाणी व आॅक्सिजनचा मोठा स्रोेत म्हणून या वनपरिक्षेत्राकडे पाहिले जाते.
‘दाजीपूर अभयारण्य’
राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. ते पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला असून रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वांत पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली आणि त्यावेळी याला ‘दाजीपूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. तसेच २३५ प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फूलझाडांच्या प्रजाती, तर ३०० औषधी वनस्पती आढळतात. २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने याला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.
आढळणारे प्राणी
दुर्मीळ होत चाललेला पट्टेरी वाघ, बिबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारे लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा यात समावेश होतो. तसेच गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरू, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर याचबरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.
एकूण वनक्षेत्र असे
साल घनदाट जंगल खुले जंगल एकूण जंगल
२००१ ११४५ चौ.कि.मी. ६६९.३९ चौ.कि.मी. १८१४ चौ.कि.मी
२०१५ ११०३ चौ.कि.मी. ६७९.८९ चौ.कि.मी. १७८२ चौ.कि.मी
२०१७ १०८८ चौ. कि.मी. ७०८.५९ चौ. कि.मी. १७९६ चौ.कि.मी.