प्रजासत्ताकदिनी कोल्हापुरात रंगणार रिक्षा सौंदर्य स्पर्धा, रिक्षा चालकांचा थरार पाहायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 02:37 PM2023-01-06T14:37:06+5:302023-01-06T15:44:31+5:30
स्पर्धेतून महाराष्ट्र रिक्षा सुंदरी, कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताब देऊन गौरविण्यात येणार
कोल्हापूर : शिवाजीपेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे प्रजासत्ताकदिनी (दि. २६ जानेवारी) सकाळी १० वाजता रिक्षा सौंदर्य राज्यस्तरीय स्पर्धा आणि प्रामाणिक रिक्षाचालकांचा सत्कार होणार आहे. स्पर्धेतून महाराष्ट्र रिक्षा सुंदरी, कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताब देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक आणि महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव यांनी दिली.
यंदा या स्पर्धेचे २३ वे वर्षे आहे. निवृत्ती चौकात दि.२६ जानेवारी रोजी सन २०१९ ते २०२२ आणि सन २०१९ या दोन गटात स्पर्धा होणार आहे. त्यातील महाराष्ट्र रिक्षा सुंदरी किताब पटकाविलेल्या रिक्षाचालकाला चांदीचे मेडल, मानाचा फेटा, तर कोल्हापूर रिक्षा सुंदरी किताबाचा मानकरी ठरलेल्या चालकाला सन्मानचिन्ह, मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येईल. दोन्ही गटात प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सोलापूर, बेळगाव, कोकणातील सुमारे ४५ रिक्षाचालक सहभागी होतील. दोन चाकांवर आणि रिव्हर्स रिक्षा चालविण्याच्या प्रात्यक्षिकांचे स्पर्धेवेळी सादरीकरण होणार आहे. यावेळी विष्णुपंत पोवार, दीपक पोवार, संदीप जगताप, विनायक पत्रावळे आदी उपस्थित होते.