जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:00 AM2019-01-19T11:00:04+5:302019-01-19T11:02:27+5:30
राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.
कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या युरो मानांकनातील आहेत.
प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून विकसनशील देशांमध्ये बीएस- ही युरो मानांकन करणारी वाहनांची श्रृंखला निर्माण करण्यात आली.
यात वातावरणात कमी प्रदूषण करतील अशा इंजिनांची निर्मिती वाहन उत्पादक कंपन्यांनी केली. त्यानुसार भारतात बी. एस. १ ते आतापर्यंत बी. एस. ६ इथपर्यंत मानांकनानुसार वाहने रस्त्यांवर धावू लागली. त्यात कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली. यातही मग पहिल्या मानांकनानुसार बनविण्यात आलेली आधीची वाहने अधिक प्रदूषण करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे ती रस्त्यांवरून हटवून स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्वांत चांगला पर्याय म्हणून सीएनजी अर्थात कॉम्प्रेसिव्ह नॅचरल गॅसवर वाहने चालविणे अधिक सोईस्कर व पर्यावरणपूरक झाले आहे. याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
सन २०१३ साली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या शहरांतील १६ आणि २० वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅप करण्याचा पहिला निर्णय राज्य शासनाने घेतला. आता उर्वरित महाराष्ट्रात हा निर्णय लागू करण्यात आला आहे. कोल्हापूरचा विचार करता, आजमितीला तीन हजार ९१६ रिक्षांनी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडली आहे. २०१९ पूर्ण होईपर्यंत २६४ रिक्षांची भर पडणार आहे; तर २०२० साल पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी १६३ रिक्षांची भर पडणार आहे.
जिल्ह्यात आजमितीला १६ हजार ९७६ रिक्षा आहेत. त्यांपैकी तीन हजार ९१६ रिक्षांंनी १६ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या रिक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. अशा रिक्षांच्या देखभाल -दुरुस्तीवरही अधिक खर्च होतो. शिवाय नवीन गाडी घेतल्यानंतर पर्यावरणाचा ºहास रोखण्यास मदत व प्रवाशांना आरामदायी प्रवासही मिळेल. त्यामुळे रिक्षाचालकांनी विचार करावा.
- अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
वाढत्या प्रदूषणाबाबत रिक्षाचालकांवरच गंडांतर का? इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अन्यथा हा लढा सुरूच राहील.
- राजू जाधव,
रिक्षाचालक सेना, जिल्हाप्रमुख