लढा तीव्र करण्याचा रिक्षाचालकांचा निर्धार

By admin | Published: February 14, 2016 12:53 AM2016-02-14T00:53:53+5:302016-02-14T00:53:53+5:30

परवाना नूतनीकरण शुल्कवाढ : ‘आरटीओ’ला निवेदन देण्याचा निर्णय

The rickshaw drivers decided to intensify the fight | लढा तीव्र करण्याचा रिक्षाचालकांचा निर्धार

लढा तीव्र करण्याचा रिक्षाचालकांचा निर्धार

Next

कोल्हापूर : शासनाने रिक्षा परमिट नूतनीकरण शुल्कामध्ये केलेल्या अन्यायी दरवाढ निर्णयाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्धार कोल्हापुरातील रिक्षा संघटना व रिक्षाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत मंगळवारी (दि. १६) दुपारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय झाला.
नजीकच्या कालावधीत या लढ्याची व्याप्ती वाढवून पश्चिम महाराष्ट्रातील रिक्षा एकाच दिवशी बंद करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या मेळाव्यास जिल्ह्यातील सुमारे दहा रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा गांधी मैदान येथे शनिवारी सायंकाळी झाला.
रिक्षांचे परमिट नूतनीकरण शुल्कात वाढ रद्द करावी, परमिट नूतनीकरण मुदतबाह्य झाल्यास प्रतिमहा ५००० रुपये दंडाची केलेली तरतूद रद्द करावी, परमिट हस्तांतर शुल्कामध्ये अन्यायी वाढ केल्याने राज्यातील रिक्षाचालकांत संताप पसरला आहे. मुंबई आणि पुणे ही दोन विकसित शहरे नजरेसमोर ठेवून घेतलेला हा निर्णय कोल्हापूर, सांगली, सातारासारख्या निमशहरी भागांना लावू नये, अशाही सूचना यावेळी रिक्षाचालकांनी मांडल्या; तर शासनाने हा अन्यायी शुल्कवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा यावेळी निर्धार केला. ही अन्यायी शुल्कवाढ रद्द करावी, या मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना शिष्टमंडळाद्वारे देण्याचा निर्णय झाला. लढ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र स्तरावर समिती करून त्याद्वारे लढा तीव्र करण्याचा व त्यासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, कऱ्हाड, सातारातील रिक्षाचालकांचा मेळावा घेण्याचाही निर्णय झाला. मेळाव्यात, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, चंदू भोसले, वसंत पाटील, न्यू करवीर रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे, ताराराणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर पंडित यांनी विचार मांडले.
यावेळी चालक-मालक रिक्षा संघटनेचे राजू पाटील, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यवसाय संघटनेचे मोहन बागडी, कॉमन मॅन संघटनेचे अविनाश दिंडे, आदर्श युनियनचे ईश्वर चन्नी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटनेचे सरपुद्दीन शेख, भाजप रिक्षा संघटनेचे विजय गायकवाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
परमिटधारक चालक
कोल्हापूर शहर ४५००
कोल्हापूर जिल्हा १९५००
सांगली जिल्हा ९०००
सातारा जिल्हा ६१००
परमिट शुल्क जुने, कंसातील नवे शुल्क
४परमिट नूतनीकरण - २०० रु. (१००० रु)
४परमिट हस्तांतर - २०० रु. (१०००रु)
४परमिट मुदतबाह्य - १०० रु. प्रतिमहा (५००० रु. प्रतिमहा)

Web Title: The rickshaw drivers decided to intensify the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.