रिक्षाचालकाच्या खूनाचा उलगडा : चौघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 06:11 PM2020-06-05T18:11:25+5:302020-06-05T18:19:45+5:30
साळोखे पार्क, भारतनगर येथे राहणाऱा रिक्षाचालक लक्ष्मण भागवत डावारे (वय ३१, रा. भारतनगर, साळोखे पार्क) याचा तोंडावर उशी ठेवून, गळा आवळून खून करून मृतदेह ओढ्यात टाकणाऱ्या चौघा संशयितांना जुना राजवाडा पोलीसांनी शुक्रवारी अटक केली.
कोल्हापूर :साळोखे पार्क, भारतनगर येथे राहणाऱा रिक्षाचालक लक्ष्मण भागवत डावारे (वय ३१, रा. भारतनगर, साळोखे पार्क) याचा तोंडावर उशी ठेवून, गळा आवळून खून करून मृतदेह ओढ्यात टाकणाऱ्या चौघा संशयितांना जुना राजवाडा पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. यात संशयित किशोर भगवान आयरे (वय ३०), करण नंदकुमार कंगले (वय २१), अमोल दिलीप खर्जे, समाधान बळी कांबळे (वय २६ सर्व रा. भारतनगर , साळोखे पार्क ) या चौघांचा समावेश आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनूसार मयत रिक्षाचालक लक्ष्मण डावरे हा साळोखे पार्क येथे राहत होता. त्याच्या शेजारी किशोर आयरे यांचे दुकान व घर आहे. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित आयरे याच्या पत्नीशी मयत लक्ष्मण याचे अनैतिक संबध असल्याचा संशय संशयित किशोर यास होता.
याबाबत वारंवार दोघांमध्ये भांडणे होत होती. बुधवारी (दि. ३) या दोघांत भांडणेही झाल्याची माहीती शेजाऱ्यांकडून पोलीसांना समजली. त्यानंतर आयरे याने (दि. ३) च्या मध्यरात्री त्याच्या शिवाय घरात कोणी नसल्याची खात्री संशयितांनी केली. त्यानंतर घरी प्रवेश करीत त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्याचा खून करण्यात आला. त्याच रात्री संशयित किशोर याने मित्राची रिक्षा अगोदरच आणून ठेवली होती. त्यातून मयत लक्ष्मणला घालून त्याचा मृतदेह आयसोलेशन च्या मागील बाजूस असणाऱ्या ओढयात टाकून दिला.
प्रथमक्षणी बघणाऱ्याला तो तरंगताना दिसला. त्यामुळे कोणीतरी पाण्यात बूडून अथवा आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले. मात्र, पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर त्याचा शव विच्छेदन अहवाल आला. त्यात गळा आवळून खून केल्याचे निष्पन झाले. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवित जुना राजवाडा पोलीसांनी गुरूवारी रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत यातील संशयितांना ताब्यात घेतले.